राहुल गांधी, प्रशांत किशोर, अशोक लवासा यांच्यासह दोन मंत्रीही लक्ष्य ठरल्याची शक्यता

नवी दिल्ली : ‘पेगॅसस’ हेरगिरी तंत्रज्ञानाद्वारे पाळतीची पाळेमुळे खोलवर गेल्याचे ‘द वायर’सह १६ माध्यमसंस्थांनी केलेल्या शोधपत्रकारितेतून उघड झाले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अन्य एक मंत्री, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर, माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा आदींनाही ‘पेगॅसस’द्वारे लक्ष्य करण्यात आल्याची शक्यता माध्यमांनी वर्तवली आहे.

‘एनएसओ’ या इस्रायली गुप्तहेर तंत्रज्ञान संस्थेच्या ‘पेगॅसस’ तंत्रज्ञानाआधारे देशातील राजकीय नेते, मंत्री, पत्रकार, सामाजिक कार्यकत्यांचे फोन ‘हॅक’ करण्यात आल्याचा दावा ‘प्रोजेक्ट पेगॅसस’द्वारे माध्यमांनी केला. ‘द वायर’च्या लेखामधून सोमवारी उघड झालेल्या नावांमध्ये तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील

कर्मचाऱ्यावरही पाळत ठेवण्यात आल्याचा संशय आहे. या सर्व व्यक्तींचे फोन ‘पेगॅसस’ तंत्रज्ञानाद्वारे ‘हॅक’ करून त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आल्याची शक्यता ‘प्रोजेक्ट पेगॅसस’मध्ये माध्यमांनी व्यक्त केली.

‘पेगॅसस’ हे तंत्रज्ञान फक्त देशांच्या सरकारांना विकले जात असल्याने भारतात केंद्रातील सत्ताधारी सरकारच्या वतीने हेरगिरी केली गेल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.

राहुल गांधी यांचे दोन फोन क्रमांक व त्यांच्या पाच मित्रांच्याही फोन क्रमांकाचा समावेश भारतातील पाळत ठेवलेल्या संभाव्य ३०० व्यक्तींच्या यादीत आहे, मात्र राहुल गांधी व त्यांच्या मित्रांच्या मोबाइल फोन उपकरणाची न्यायवैद्यक चिकित्सा झाल्याशिवाय ठोस निष्कर्ष काढता येणार नसल्याचेही माध्यम संस्थांनी स्पष्ट केले आहे. राहुल गांधी यांनी या दोन्ही फोन क्रमांकाचा वापर थांबवलेला असून त्यांच्या फोन उपकरणाची न्यायवैद्यक तपासणी झालेली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

२०१९ मध्ये आचारसंहिता भंग केल्याच्या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी व तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना निर्दोष ठरवण्यास माजी केंद्रीय निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी नकार दिला होता. लवासा यांचे माजी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्याशी मतभेद झाले होते. त्यानंतर लवासा यांची आशियाई विकास बँकेवर संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या कर्मचाऱ्याचे तीन फोन क्रमांक हॅक करण्यात आल्याचा संशय आहे. विद्यमान मंत्री अश्विनी वैष्णव यांचा फोन २०१७ मध्ये, तर राहुल गांधी यांच्यावर २०१८-१९ मध्ये पाळत ठेवण्यात आल्याची शक्यता आहे. त्या काळात वैष्णव मंत्री वा खासदारही नव्हते. मंत्री प्रल्हाद पटेल व त्यांची पत्नीच नव्हे तर, त्यांच्याशी निगडित १५ जणांचेही फोन हॅक केले गेल्याचा दावा ‘द वायर’मध्ये करण्यात आला आहे. विषाणूशास्त्रज्ञ गंगदीप कांग यांच्याही फोनमध्ये हेरगिरी तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या फोन उपकरणाची न्यायवैद्यक तपासणी झाली असून १४ जुलैच्या आसपास फोन हॅक झालेला असल्याचा दावा चिकित्सा अहवालात करण्यात आला आहे.

भारतीय लोकशाहीच्या बदनामीचा हेतू : वैष्णव

केंद्र सरकारने फोन हॅक झाल्याचा दावा स्पष्ट शब्दांत फेटाळला. ‘द वायर’ वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या लेखातील दाव्यांना कोणताही वस्तुनिष्ठ आधार नाही. या दाव्यामागे भारताच्या लोकशाही व्यवस्थेला बदनाम करण्याचा आणि सनसनाटी निर्माण करण्याचा हेतू आहे, असा आरोप केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी लोकसभेत केला. भारतात संस्थात्मक संरचना अस्तित्वात असून तिच्याशी संबंधित कायद्यांची चौकट पाळली जाते. नियमांच्या आधारे पाळत ठेवली जाते. कोणत्या नियमांच्या आधारे हेरगिरी केली जाते, हे आता विरोधी बाकांवर बसणाऱ्या पण, कधीकाळी सत्तेत असणाऱ्या पक्षांना माहिती आहे. त्यामुळे देशात बेकायदा हेरगिरी केली जात नाही याची जाणीव विरोधी पक्षांनाही आहे, असे वैष्णव म्हणाले.

कारस्थान यशस्वी होणार नाही : शहा

’या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेस आणि आंतरराष्ट्रीय माध्यमसंस्थांवर जोरदार टीकास्त्र सोडले. आपल्या कारस्थानांद्वारे अशा प्रकारे अडथळे आणणारे भारताचा विकासाचा मार्ग रोखू शकणार नाहीत, असे शहा म्हणाले.

’जागतिक व्यासपीठावर भारताला अवमानित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणाऱ्या काही मूठभर लोकांनी कथित हेरगिरीबाबतच्या या अहवालाचा मोठा गाजावाजा केला आहे. मात्र, हा घटनाक्रम भारतीय नागरिकांना चांगल्या प्रकारे कळतो, असेही ते म्हणाले.

चौकशीची काँग्रेसची मागणी

या संपूर्ण प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीद्वारे वा विशेष तपास समिती स्थापन करून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसने केली. हे कथित पाळत प्रकरण केंद्रीय गृहमंत्रालयाशी निगडित असल्याने या खात्याचे मंत्री अमित शहा यांनी तातडीने राजीनामा द्यावा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या प्रकरणातील सहभागीचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

Story img Loader