खासदारकी रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाच्या मुख्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अदाणी समूहाचे प्रमुख गौतम अदाणी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. माझी खासदारकी रद्द केली तरी मी तुम्हाला घाबरणार नाही. गौतम अदाणी आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय संबंध आहेत? हा प्रश्न मी विचारणारच असं राहुल गांधींनी स्पष्ट केलं.
ओबीसी समुदायाचा अवमान केल्याप्रकरणी विचारलं असता राहुल गांधी म्हणाले, “तो ओबीसीच्या अवमानाचा प्रश्न नाही, तो गौतम अदाणी आणि नरेंद्र मोदी यांच्या संबंधांचं प्रकरण आहे. अदाणींना २० हजार कोटी रुपये कुठून मिळाले? ते माहीत नाही. त्याबाबत मी प्रश्न विचारत आहे. त्याचं उत्तर हवं आहे. भाजपा लोकांचं लक्ष हटवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी ते कधी ओबीसीबद्दल बोलतात, कधी विदेशाबद्दल बोलतात तर कधी अपात्र ठरवतात. पण माझा प्रश्न कायम आहे, अदाणींच्या कंपनीत गुंतवलेले २० हजार कोटी रुपये कुणाचे होते?”
पत्रकार परिषदेत राहुल गांधी पुढे म्हणाले, “या देशातील स्वायत्त संस्थांवर आक्रमण केलं जात आहे. त्या आक्रमणाचा ‘मॅकेनिझम’ काय आहे? त्या आक्रमणाचा मॅकेनिझम नरेंद्र मोदी आणि अदाणी यांच्यातील संबंध आहेत. तो पाया आहे. मी नरेंद्र मोदींना प्रश्न विचारत नाही. मी अदाणींना प्रश्न विचारत आहे. भाजपा अदाणींना का वाचवत आहे? तुम्ही नरेंद्र मोदींना वाचवा. पण तुम्ही अदाणींना का वाचवत आहात? हा माझा प्रश्न आहे. तुम्ही अदाणींना वाचवत आहात कारण, तुम्हीच अदाणी आहात.”
हेही वाचा- अदाणींच्या कंपनीत गुंतवलेले २० हजार कोटी कुणाचे? राहुल गांधींचा परखड सवाल, नेमका रोख कुणाकडे?
“माझी खासदारकी रद्द केल्याने मी प्रश्न विचारणं बंद करणार नाही. नरेंद्र मोदी आणि गौतम अदाणी यांचा काय संबंध आहे? अदाणींच्या कंपनीत शेल कंपन्याद्वारे गुंतवलेले २० हजार कोटी रुपये कुणाचे आहेत? हा प्रश्न मी विचारत राहीन. मला या लोकांची भीती वाटत नाही. त्यांना जर वाटत असेल की माझं सदस्यत्व रद्द करून, मला धमकावून किंवा मला तुरुंगात पाठवून ते माझा आवाज बंद करू शकतील, तर मी घाबरणारी व्यक्ती नाही. मी भारताच्या लोकशाहीसाठी लढत आहे आणि पुढेही लढत राहीन,” अशा शब्दांत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.