उत्तर प्रदेशमध्ये शिक्षक भरतीत घोटाळा झाल्याचा आरोप करत अनेक तरूण हातात मेणबत्ती घेऊन रस्त्यावर उतरले. मात्र, उत्तर प्रदेश पोलिसांनी या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यानं मोठा गदारोळ होत आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांनी या कारवाईवरून उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर हल्लाबोल केलाय. याशिवाय काही माजी आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांनी देखील या लाठीचार्जचा निषेध करत सरकारला लक्ष्य केलं. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी देखील ट्वीट करत योगी सरकारवर हल्ला चढवला आहे.

राहुल गांधी म्हणाले, “रोजगार मागणाऱ्यांना उत्तर प्रदेश सरकारने लाठ्या दिल्या. भाजपा जेव्हा मतं मागायला येईल तेव्हा हे लक्षात ठेवा.”

राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश पोलिसांनी आंदोलक तरुणांवर केलेल्या लाठीचार्जचा एक व्हिडीओ देखील ट्वीट केलाय.

प्रियंका गांधी म्हणाल्या, “उत्तर प्रदेशचे तरुण हातात मेणबत्तीचा प्रकाश घेऊन रोजगार द्या ही मागणी करत होते. मात्र, योगी सरकारने त्या तरुणांवर लाठीचार्ज केला. तरुणांनो यांनी कितीही लाठीचार्ज करु द्या, रोजगाराच्या हक्काची लढाई थांबू देऊ नका. या लढाईत मी तुमच्यासोबत आहे.”

“उत्तर प्रदेश टीईटी (UP TET) घोटाळ्यात केवळ दाळीत काही तरी काळं नाही, तर पूर्ण दाळच काळी आहे. प्रश्नपत्रिका छापण्याचा ठेका देण्यापासून परीक्षा व्यवस्थापनापर्यंत सर्वच स्तरावर भ्रष्टाचार आहे. उत्तर प्रदेश सरकार पूर्णपणे भ्रष्ट आणि तरुणांच्या विरोधी आहे,” असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला.

दरम्यान, याआधीही प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील सहशिक्षक भरती घोटाळ्यावर हल्लाबोल केला होता. त्यांनी ट्वीट करत म्हटलं होतं, “उत्तर प्रदेश टीईटी परीक्षा घोटाळ्याचा मास्टरमाईंड भाजपा आमदाराचा भाऊ आहे. योगी आदित्यनाथ यांची सक्ती आणि पारदर्शकतेच्या गप्पा पोकळ आहेत.”

हेही वाचा : “उत्तर प्रदेशचे हे IAS अधिकारी प्रचंड अहंकारी”, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली, दोघांची अटक अटळ

“२७ नोव्हेंबरला उत्तर प्रदेश टीईटीची परीक्षा झाली. या परीक्षेसाठी २२ लाख तरुणांनी मेहनत केली. २ वर्ष कष्ट केले. त्याचं काय झालं, तर प्रश्नपत्रिका फुटली, परीक्षा रद्द करण्यात आली. भरती प्रक्रिया पुन्हा प्रलंबित झाली. मी अशा तरुणांशी बोलले आहे जे मागील ६ वर्षांपासून नियुक्तीची वाट पाहत आहेत. त्यांनी ४-५ परीक्षा दिल्या आहेत. मात्र, आजपर्यंत त्यांना रोजगार मिळाला नाही,” असंही प्रियंका गांधी यांनी नमूद केलं.

Story img Loader