पीटीआय, रांची
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला विजय मिळवून केंद्रात सरकार स्थापन केल्यास, देशभरात जातीनिहाय जनगणना केली जाईल तसेच राखीव जागांसाठी असलेली ५० टक्क्यांची मर्यादा हटवली जाईल असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी दिले. राहुल यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या काँग्रेसच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’दरम्यान शहीद मैदानात झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते.
यावेळी बोलताना राहुल यांनी आरोप केला की, झारखंडमधील मुख्यमंत्री आदिवासी असल्यामुळे भाजपने राज्यातील झामुमो-काँग्रेस-राजद आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजप, संघाचे हे कारस्थान थांबवल्याबद्दल मी सर्व आमदार आणि चंपाई सोरेन यांचे अभिनंदन करतो असे राहुल म्हणाले.दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीयांना वेठबिगार केले जात आहे आणि मोठमोठय़ा कंपन्या, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये आणि न्यायालयांमध्ये त्यांना सहभाग नाकारला जात आहे असा दावाही राहुल यांनी आपल्या केला.