जगदलपूर (छत्तीसगड) : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी जर देशात ‘गरीब’ ही एकच जात असल्याचा दावा करतात तर मग ते स्वत:ला वारंवार ‘ओबीसी’ प्रवर्गातील का म्हणवून घेत आहेत?’’ असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला. बस्तर जिल्ह्यातील जगदलपूर जिल्हा मुख्यालयात निवडणूक प्रचारसभेस संबोधित करताना राहुल म्हणाले, भाजप नेते आदिवासींना ‘वनवासी’ म्हणतात कारण त्यांना आदिवासींना त्यांचे स्थान फक्त जंगलातच असायला हवे, हे दाखवायचे आहे.
छत्तीसगडमधील ९० जागांसाठी विधानसभा निवडणुकीसाठी ७ आणि १७ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. बस्तर जिल्ह्यात झालेल्या या सभेत राहुल म्हणाले की, मोदींच्या मते या देशात दलित नाहीत, आदिवासी नाहीत, मागासवर्गीय नागरिक नाहीत. मात्र, वास्तवात सर्वाना माहीत आहे की या देशात आदिवासी भाषा-संस्कृती आहे आणि आदिवासी इतिहास आहे. येथे दलित आहेत. त्यांचा अपमान केला जातो.
हेही वाचा >>>“…अन् यांनी ‘महादेव’ नावंही सोडलं नाही”, पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका
देशातील सर्वात मोठी जात गरीब : मोदी
दुर्ग जिल्ह्यात शनिवारी झालेल्या निवडणूक प्रचारसभेस संबोधित करताना मोदी यांनी देशातील सर्वात मोठी जात ‘गरीब’ असून, आपण त्यांचे ‘सेवक’ असल्याचा दावा केला होता. मोदी म्हणाले की, विरोधी राजकीय पक्ष गरिबांमध्ये फूट पाडण्याचे कारस्थान रचत आहेत.