पीटीआय, नवी दिल्ली
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील एका रॅलीदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेली टिप्पणी बेजबाबदार असल्याचे सांगून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना खडे बोल सुनावले. महात्मा गांधींपासून ते इंदिरा गांधींपर्यंत नेत्यांनी केलेल्या सावरकरांच्या स्तुतीचे स्मरण न्यायालयाने करून दिले. त्याच वेळी राहुल गांधींविरोधातील फौजदारी कारवाईबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली.
न्या. दीपंकर दत्ता आणि मनमोहन यांच्या खंडपीठाने राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबाबत टिप्पणी केली. ‘स्वातंत्र्यसैनिकांची खिल्ली उडवू नका,’ असे सांगतानाच न्यायालय म्हणाले, ‘महात्मा गांधी यांनीही ब्रिटिशांशी संवाद साधताना ‘तुमचे निष्ठावान सेवक’ (यूअर फेथफुल सर्व्हंट) असे शब्द वापरले होते, त्यांना (राहुल गांधी) हे माहीत आहे का?’ गांधी यांच्याविरोधात द्वेष पसरवणे आणि सार्वजनिक ठिकाणी अयोग्य वर्तनाचे आरोप झालेले नाहीत, असा युक्तिवाद सिंघवी यांनी केलाय त्यावर खंडपीठ म्हणाले, ‘तुम्ही अगदी आज्ञार्थी आहात… तुमच्या आशिलाला (राहुल गांधी) माहीत आहे का, की महात्मा गांधी यांनीही व्हाइसरॉयला उद्देशून बोलताना ‘तुमचे निष्ठावान सेवक’ (यूअर फेथफुल सर्व्हंट) असे शब्द वापरले होते? महात्मा गांधींना त्यावरून ब्रिटिशांचे निष्ठावान सेवक मानायचे का? त्या काळी, अगदी मीही पाहिले आहे, की कलकत्ता उच्च न्यायालयातील आपले न्यायाधीश मुख्य न्यायाधीशाला उद्देशून ‘तुमचे सेवक’ (यूअर सर्व्हंट) असे संबोधत असत.’
न्या. दत्ता यांनी सांगितले, ‘तुमच्या आशिलाला माहीत आहे का, की त्यांच्या आजीने (इंदिरा गांधी) पंतप्रधान असताना सावरकर यांची स्तुती करणारे पत्र लिहिले होते? स्वातंत्र्यसैनिकांच्या बाबतीत कुठलीही बेजबाबदार विधाने करू नका. तुम्ही कायद्याबाबत चांगला मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावर आम्ही काही बोलणार नाही. यापुढे अशा प्रकारच्या कुठल्याही विधानाची आम्ही स्वत:हून दखल घेऊ. स्वातंत्र्यसैनिकांबाबत आणखी एकही शब्द नको…त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले आणि त्यांना आपण अशा प्रकारची वर्तणूक द्यायची का? ही पद्धत योग्य नव्हे,’ असा इशारा न्यायालयाने दिला.
न्यायालयाने यानंतर उत्तर प्रदेश सरकारला आणि तक्रारदार वकील नृपेंद्र पांडे यांना नोटीस दिली आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाने राहुल गांधींना बजावलेले समन्स रद्द करण्यास नकार दिला होता. गांधींविरोधातील फौजदारी कारवाईलाही न्यायालयाने स्थगिती दिली.
‘इतिहास माहीत नसेल, तर टिप्पणी नको’
राहुल गांधी यांचा हेतू समाजामध्ये द्वेषभावना पसरविण्याचा नव्हता, त्यामुळे न्यायालयाने कुठलीही टिप्पणी करू नये, अशी विनंती सिंघवी यांनी केली. मात्र, त्यावर न्यायालयाने सिंघवी यांना खडसावले.‘स्वातंत्र्यसैनिकांना अशी वर्तणूक योग्य नाही… देशाच्या इतिहासाबद्दल तुम्हाला काही माहीत नसेल, तर तुम्ही अशा प्रकारची टिप्पणी करायला नको. ते एका राजकीय पक्षाचे नेते आहेत. अशा प्रकारची टिप्पणी तुम्ही कशी करता? तुम्ही महाराष्ट्रात जाता. तेथे लोक सावरकरांना मानतात. असे करू नका.’
महत्त्वाच्या टिप्पणी
●महात्मा गांधी यांनीही ब्रिटिशांशी संवाद साधताना ‘तुमचे निष्ठावान सेवक’ (यूअर फेथफुल सर्व्हंट) असे शब्द वापरले होते, त्यांना (राहुल गांधी) हे माहीत आहे का?