नवी दिल्ली : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे पडसाद सोमवारी संसदेत उमटले. शिर्डीमध्ये एकाच इमारतीत ७ हजार नवे मतदार यादीमध्ये सामील केल्याचा दावा करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निकालावर शंका उपस्थित केली. मतदार अचानक आले कुठून, असा प्रश्न विचारत त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर लोकसभेत सोमवारी चर्चा सुरू झाली. यावेळी गांधी यांनी देशातील निवडणूक प्रक्रियांबाबत साशंकता व्यक्त केली. “महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणूक आम्ही (इंडिया आघाडी) जिंकलो. त्यानंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ७० लाख नव्या मतदारांची नावे यादीमध्ये सामाविष्ट केली गेली. लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकांमध्ये इतक्या मोठ्या संख्येने अतिरिक्त मतदार कसे समाविष्ट केले जाऊ शकतात? हा सगळा प्रकारच गोलमाल आहे,” भाजपने जिंकलेल्या मतदारसंघांमध्ये मोठ्या संख्येने मतदार वाढल्याचा गंभीर आरोप गांधींनी केला.
पंतप्रधानांवर टिप्पणी
महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी केंद्रीय निवडणूक आयोगावर शरसंधान साधत असताना लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. निवडणुकीचे निकाल भाजपसाठी अडचणी असल्याचे सूचित करत, ‘बघा, पंतप्रधान मोदी माझ्याकडे बघतदेखील नाहीत’, असा टोमणा राहुल गांधींनी लगावला. या टिप्पणीवर सभागृहात भाजपचे सदस्य आक्रमक झाले.
निवडणूक आयोगावर टीका
राज्यात अचानक इतके मतदार कसे वाढले, याची शहानिशा करण्यासाठी आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मतदारांची नावे, पत्ता आणि मतदान केंद्र याची माहिती मागितली होती. काँग्रेस, शिवसेना (ठाकरे) व राष्ट्रवादी (शरद पवार) गट हे ‘इंडिया’ आघाडीतील घटक पक्ष ही माहिती तपासून पाहतील, असे सांगितले होते. मात्र, आयोग आम्हाला माहिती देणार नाही याची खात्री असल्याची उपहासात्मक टिप्पणी गांधी यांनी केली.
आयुक्त निवडीवर सवाल
केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या निवडीमध्ये केंद्र सरकार मनमानी करत असल्यामुळे मतदानाची तारीख बदलली जाते, निवडणुका लांबणीवर टाकल्या जातात, असा आरोप राहुल गांधींनी केला. “आधी निवड समितीच्या सदस्यांमध्ये सरन्यायाधीशांचा समावेश होता. मात्र सरकारने सरन्यायाधीशांना काढून टाकले. आता पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेता म्हणून मी असे समितीमध्ये आहोत. मोदी आणि शहा बहुमताने निर्णय घेणार आणि मला त्यांचा निर्णय मान्य करावा लागणार. सरन्यायाधीश सदस्य असते तर समितीमध्ये सविस्तर चर्चा झाली असती. आता मी या समितीच्या बैठकीला कशासाठी जायचे हा मला प्रश्न पडला आहे,” असे ते म्हणाले.
राज्यात एकाचवेळी ७० लाख मतदार वाढणे अशक्य आहे. जे पाच वर्षांतदेखील होऊ शकत नाही ते, अवघ्या पाच महिन्यांमध्ये कसे घडू शकते? हिमाचल प्रदेशची लोकसंख्या ७० लाख असून अख्ख्या हिमालच प्रदेशने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान केले असे म्हणायचे काय?
– राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा
दिल्लीसाठी ईश्वर किंवा मोदीच!
दिल्लीचा विकास केवळ ईश्वर किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदीच करू शकतात असा दावा भाजपचे दक्षिण दिल्लीचे खासदार रामवीर सिंह बिधुरी यांनी सोमवारी केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला सोमवारी लोकसभेत चर्चेला सुरुवात करताना बिधुरी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर आम आदमी पक्षाच्या सरकारवर टीका केली. ‘आप’ सरकारने दिल्लीची लूट करून राष्ट्रीय राजधानीचा नरक करून टाकला असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने दिल्लीकरांसाठी गृहनिर्माण, वाहतूक, आरोग्यसेवा आणि इतर योजना सुरू केल्याचे बिधुरी म्हणाले.
ट्रम्प शपथविधीवरून टोलेबाजी
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्या शपथविधी सोहळ्याचे पंतप्रधान मोदींना आमंत्रण नव्हते. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर त्यासाठी मध्यस्थी करण्याकरिता अमेरिकेला गेले होते, असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी लोकसभेत केला. यावर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आक्षेप घेतला. तर जयशंकर यांनीही ‘एक्स’वरील संदेशात राहुल गांधींचा दावा फेटाळून लावला.