भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे प्रबळ उमेदवार नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी त्यांच्यावर निशाणा साधला. कॉन्फडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजच्या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी जातीभेदाचे राजकारण देशाला पुढे घेऊन जाऊ शकणार नाही. त्यामुळे विकास खुंटेल, असे मत व्यक्त केले.
सीआयआयच्या वार्षिक बैठकीमध्ये देशातील दिग्गज उद्योजकांपुढे राहुल गांधी यांनी आपले विचार मांडले. सुमारे तासाभराच्या भाषणात त्यांनी देशातील सामान्यांचे हात अधिक सशक्त करण्यावर आणि सर्वदूर महत्त्वाच्या पायाभूत सुविधा पुरविण्यावर भर दिला. देशातील सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्यावर कॉंग्रेस पक्षाचा विश्वास आहे, असे सांगून राहुल गांधी म्हणाले, जाती-जातींमधील तणाव कमी करून सौहार्दपूर्ण वातावरण यूपीए सरकारने निर्माण केल्यामुळे देश वेगाने आर्थिक विकास साध्य करू शकला.
जेव्हा तुम्ही जातीभेदाचे राजकारण करता, सामान्यांचा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न करता. त्यावेळी त्याचा परिणाम सर्वांनाच भोगावा लागतो. उद्योग जगतालाही याचा मोठा फटका बसतो. अस्थिरतेच्या वातावरणात सर्वसामान्यांची स्वप्ने धुळीला मिळतात आणि त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी अनेक वर्षे लोटतात, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
अल्पसंख्यांकांच्या हिताचे रक्षण न केल्याचा आरोप सातत्याने नरेंद्र मोदींवर करण्यात येतो. त्यापार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी मांडलेले विचार त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करणारे असल्याची चर्चा आहे.
जातीभेदाचे राजकारण देशाला पुढे नेणार नाही; राहुल गांधींनी साधला मोदींवर निशाणा
भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे प्रबळ उमेदवार नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी त्यांच्यावर निशाणा साधला.
First published on: 04-04-2013 at 04:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi raps narendra modi for alienating muslims hurting india