काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पंजाबचे गायक सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुसेवाला यांना श्रद्धांजली वाहिली. मार्चमध्ये झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत मूसवाला यांनी काँग्रेसच्या तिकिटावर मानसा गावातून निवडणूक लढवली होती. याआधीही राजस्थानचे नेते सचिन पायलट यांच्यासह अनेक नेत्यांनी गायकाच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
पंजाबमधील मानसा गावात पोहोचलेल्या राहुल गांधींनी मुसेवाला यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली. सुमारे ४५ मिनिटे ते सिद्धू कुटुंबासोबत होते. यावेळी त्यांच्यासोबत पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वाडिंग, प्रताप सिंग बाजवा आणि माजी उपमुख्यमंत्री अंबिका सोनी उपस्थित होते.
या भेटीनंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत पंजाबमधील आप सरकारवर टीका केली आहे. “काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या आई-वडिलांना ज्या दु:खाचा सामना करावा लागत आहे, ते शब्दात सांगणे कठीण आहे. त्यांना न्याय देणे आमचे कर्तव्य आहे आणि आम्ही ते करू. राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. आप सरकार पंजाबमध्ये शांतता राखण्यात अपयशी ठरलं आहे,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
मुसेवाला यांची २९ मे रोजी मानसा येथे अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. ही घटना घडली तेव्हा राहुल गांधी परदेशात होते आणि गेल्या आठवड्यात ते मायदेशी परतले आहेत. मुसेवालाच्या पालकांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. तत्पूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत शोक व्यक्त केला होता.
यापूर्वीही काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुसेवाला हत्याकांडाचा तपास सीबीआय किंवा एनआयए मार्फत करण्याची मागणी करण्यात आली होती.