खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेसकडून मोदी सरकावर जोरदार टीकास्र सोडण्यात येत आहे. राहुल गांधी यांनी अदाणी आणि मोदींच्या संबंधाच्या मुद्दा उपस्थित केल्यानेच ही कारवाई करण्यात आली, असा आरोप कांग्रेसकडून करण्यात आला आहे. दरम्यान, भाजपानेही या मुद्द्यावरून काँग्रेसला प्रत्युत्तर दिलं असून राहुल गांधी यांनी माफी मागितली असती, तर ही वेळ आली नसती, असं ते म्हणाले. दरम्यान, यसंदर्भात आज राहुल गांधी यांनी विचारलं असता, त्यांनी सावरकरांचं नाव घेत भाजपावर निशाणा साधला.
हेही वाचा – अदाणींच्या कंपनीत गुंतवलेले २० हजार कोटी कुणाचे? राहुल गांधींचा परखड सवाल, नेमका रोख कुणाकडे?
खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी आज पाहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्र सोडलं. तसेच अदाणी आणि मोदींच्या संबंधावर प्रश्न विचारल्यानेच माझ्याविरोधात कारवाई करण्यात आली, असा थेट आरोप त्यांनी यावेळी केला.
यावेळी, मोदी आडनावासंदर्भात केलेल्या विधानावर त्यांनी माफी का मागितली नाही, असे विचारलं असता, माझं नाव सावरकर नाही, तर गांधी आहे आणि गांधी कोणाचीही माफी मागत नाही, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी मोदी सरकावर निशाणा साधला. तसेच
देशातील लोकशाही संपली असून या देशातील संस्थांवर आक्रमण होत आहे, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – संसद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “माझी खासदारकी रद्द करून…”
दरम्यान, राहुल गांधी यांनी मोदींना चोर म्हणून ओबीसींचा अपमान केला, असा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे. या आरोपांनाही राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं. मी भारत जोडो यात्रेदरम्यान सर्व समाज घटकांना सोबत घेऊन चाललो. माझ्या यात्रेत सर्वच समाजाचे लोक सहभागी झाले होते. मुळात हा ओबीसीचा विषयच नाही. हा अदाणी आणि मोदींच्या संबंधाचा विषय आहे. ओबीसींना पुढे करत भाजपा मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यांनी कितीही आरोप केले, तरी मी त्यांना प्रश्न विचारणं बंद करणार नाही, असेही ते म्हणाले.