महात्मा गांधी यांच्यावर जेव्हा पहिला चित्रपट बनला, तेव्हा जगभरात गांधींबाबत कुतूहल निर्माण झालं. त्यापूर्वी त्यांना कोणीही ओळखत नव्हतं, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एका मुलाखतीत बोलताना केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या विधानावरून पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे.
हेही वाचा – “मोदींना परमेश्वरानंच पाठवलंय, पण कशासाठी तर…”, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्ला!
काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत मोदींच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. “महात्मा गांधींबद्दल जाणून घेण्यासाठी केवळ एंटायर पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थ्यालाच चित्रपट बघावे लागतील”, असा टोला त्यांनी लगावला.
मल्लिकार्जून खरगेंनीही दिली प्रतिक्रिया
राहुल गांधी यांच्यााशिवाय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि काँग्रेस नेते श्रीनिवास बीव्ही यांनीही या विधानावरून पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं आहे. श्रीनिवास बीव्ही यांनी जगभरातील वृत्तप्रत्राचे फोटो शेअर करत मोदींना उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. तर “ज्यांचे वैचारिक पूर्वज नथुराम गोडसेसह महात्मा गांधींच्या हत्येत सहभागी होते, ते बापूंनी दिलेल्या सत्याच्या मार्गावर कधीच चालू शकत नाही”, अशी प्रतिक्रिया मल्लिकार्जून खरगे यांनी दिली आहे.
पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले होते?
पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी एबीपी माझाला मुलाखत दिली. यावेळी बोलताना महात्मा गांधींना कोणीही ओळखत नव्हतं. त्यांच्यावर चित्रपट बनला त्यानंतर त्यांना जगभरात ओळखलं जाऊ लागलं, असं विधान त्यांनी केलं होतं. “महात्मा गांधी एक मोठं व्यक्तिमत्त्व होतं. आपण जगभरात त्यांची ओळख निर्माण करायला हवी होती. ही आपली जबाबदारी होती. मात्र, आपण त्यात अपयशी ठरलो. त्यांना कोणी ओळखत नव्हतं. ज्यावेळी महात्मा गांधींवर पहिल्यांदा चित्रपट बनला तेव्हा जगभरात गांधी कोण आहे? याबाबत कुतूहल निर्माण झालं. त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी आपण ७५ वर्षात काहीही केलं नाही” असं ते म्हणाले होते.