Rahul Gandhi remark on Sikh Community Turban : तीन दिवसांसाठी अमेरिका दौऱ्यावर गेलेले लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. अमेरिकेतील वर्जिनिया येथील एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी भारतातील शिखांच्या स्थितीबाबत भाष्य केलं होतं. राहुल गांधी यांनी प्रश्न उपस्थित केला होता की “शिखांना पगडी आणि कडं परिधान करण्याची परवानगी दिली जाते का? यावरून भारतात वाद आहे”. राहुल यांच्या या वक्तव्यावर भाजपा नेते आर. पी. सिंग व गिरीराज सिंग यांनी पलटवार केला आहे.
वर्जिनियामधील भारतीय समुदायाशी बातचीत करताना राहुल गांधी यांनी एका व्यक्तीला त्याचं नाव विचारलं, त्यावर त्या व्यक्तीने बलिंदर सिंग असं नाव सांगितल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, “भारतात एक वाद असाही आहे की यांना शीख म्हणून पगडी व कडं परिधान करण्याची परवानगी द्यायला हवी का? शीख गुरुद्वारामध्ये जाऊ शकतात का? मुळात आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की हा वाद नेमका कशावरून आहे. अशा अडचणी केवळ शिखांसमोर नाहीत. इतर धर्मांमधील लोक देखील अशा अडचणींचा सामना करत आहेत”.
हे ही वाचा >> Shivraj Singh Chouhan : अटलबिहारी वाजपेयी आणि राहुल गांधींमध्ये फरक काय? शिवराज सिंह चौहान म्हणतात…
राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपाचा संताप
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर भाजपा नेते आर. पी. सिंग यांनी टीका केली आहे. एएनआयशी बोलताना आर. पी. सिंग म्हणाले, दिल्लीत ३,००० शिखांची कत्तल झाली तेव्हा काँग्रेसचं सरकार कुठे होतं? तेव्हा शिखांच्या पगड्या उतरवण्यात आल्या होत्या. त्यांचे केस व दाढी कापून टाकली. काँग्रेस सत्तेत असताना हे सगळं घडत होतं. परदेशात जाऊन राहुल गांधी ज्या प्रकारची वक्तव्ये करतायत त्यावरून त्यांची विचारसरणी समजते. माझं राहुल गांधींना आव्हान आहे की परदेशात जाऊन ते शिखांबाबत जे काही बोलतायत ते त्यांनी भारतात बोलून दाखवावं. मी त्यांच्याविरोधात याचिका दाखल करून त्यांना न्यायालयत खेचून आणेन”.
हे ही वाचा >> Railway Tracks : रेल्वे रुळावर सिमेंटचे ब्लॉक टाकून मालगाडी रुळावरून उतरवण्याचा कट? नेमकी कुठे घडली घटना?
राहुल गांधी अज्ञानी : गिरिराज सिंग
केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी देखील राहुल गांधींच्या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “भारत स्वतंत्र झाल्यापासून तुष्टीकरणाचं राजकारण करणारी व शिखांच्या हत्या घडवून आणणारी काँग्रेस आज इतरांना धर्मनिपेक्षतेचे धडे देत आहे. काही लोक अज्ञानी असतात, मात्र ते कसे ज्ञानी आहेत हे दाखवण्याचा सतत प्रयत्न करत असतात. राहुल गांधी हे त्यांच्यापैकी एक आहेत”.