काँग्रेस पक्षाने अदाणी आणि अंबानी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात काळा पैसा गोळा केला असून हे पैसे घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांच्यावर टीका करणे बंद केले, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर केला होता. पंतप्रधान मोदींच्या या आरोपाला आता राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “मोदींनी पहिल्यांदाच अदाणी आणि अंबानी यांचे नाव घेतलं असून मोदीजी तुम्ही घाबरले आहात का?” असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
हेही वाचा – सॅम पित्रोदांकडून इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
काय म्हणाले राहुल गांधी?
एक्स या समाज माध्यमावर एक व्हिडीओ पोस्ट करत राहुल गांधी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. “मोदीजी तुम्ही घाबरले आहात का? तुम्ही नेहमी बंद खोलीत अदाणी-अंबानी यांच्याविषयी बोलता. मात्र, आज तुम्ही पहिल्यांदात सार्वजनिकरित्या अदाणी-अंबानी यांचे नाव घेतलं आहे. हे लोक टेम्पोमध्ये पैसे देतात हे तुम्हाला कसं माहिती? हा तुमचा अनुभव आहे का? एक काम करा, सीबीआय आणि ईडीला यांच्याकडे पाठवा. हे लोक पैसे वाटतात का? याची चौकशी करा”, असं प्रत्युत्तर राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना दिलं.
पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले होते?
बुधवारी एका प्रचारसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली होती. “तुम्ही मागचे पाच वर्ष पाहिले असेल की, काँग्रेसचे राजकुमार अदाणी आणि अंबानी यांच्या नावाचा जयघोष करत होते. मात्र निवडणूक जाहीर होताच अचानक त्यांनी अदाणी आणि अंबानी यांच्याविरोधात बोलणं बंद केलं आहे. दोन्ही उद्योगपतींकडून त्यांना किती बॅगा भरून काळा पैसा मिळाला? अदाणी-अंबानी आणि राहुल गांधी यांच्यात अशी कोणती डील झाली? ज्यामुळे आता एका रात्रीत राहुल गांधी यांचा दृष्टीकोन बदलला.” असे ते म्हणाले होते.