पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यावर जितकी टीका करतील, मला जितक्या शिव्या देतील, दूषणं देतील तितका माझ्यातला हुरुप वाढत जाईल. असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला उत्तर दिलं आहे. ‘मूर्खांचे सरदार’ असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आता राहुल गांधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. छत्तीसगढ या ठिकाणी राहुल गांधी एका सभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
“पंतप्रधान नरेंद्र मोदी जिथे कुठे जातात, तिथे माझ्याविषयी चुकीचे शब्द प्रयोग करतात. मला शिव्या द्या, माझ्या विषयी उलटसुलट बोलतात. चांगलं आहे, मला काही फरक पडत नाही. मी माझं लक्ष्य काय आहे तुम्हाला सांगितलं आहे. मला कितीही दूषणं दिली तरीही माझं लक्ष्य ठरलेलं आहे. जितके पैसे नरेंद्र मोदी अदाणींना देतात तेवढा पैसा मी गरीबांना देणार. एक रुपया तुम्ही अदाणींना दिलात तर एक रुपया मी गरीबांना देणार. जेवढे पैसे तुम्ही अदाणींना द्याल तेवढे पैसे मी गरीबांना देईन, त्यात छोटे दुकानदार, मजूर, बेरोजगार युवक सगळेच असतील. मी तुम्हाला सांगेन की खरं राजकारण अब्जाधीशांना मदत करुन होत नसते. खरं राजकारण गरीब शेतकरी, मजूर, छोटे दुकानदार यांना मदत केल्यानंतर होते. तुम्हाला मला जे काही बोलायचं आहे ते बोला. ज्या शिव्या द्यायच्या आहेत त्या द्या. मला जितक्या शिव्या देता त्यावरुन मला कळतं की मी बरोबर काम करतो आहे. जेवढ्या शिव्या द्याल मला कळतं मी योग्य मार्गावर आहे. मी चांगलं काम करतो, तुम्ही चिडता म्हणून तर शिव्या देता ना? ” असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींवर केली टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका असल्यामुळे प्रचाराची धामधूम सुरू आहे. त्यातच राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. नुकतेच पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना “मूर्खांचे सरदार” असल्याचे संबोधले. भारतात वापरले जाणारे मोबाइल हे शक्यतो चीनमधून तयार होऊन आलेले आहेत, अशी टिप्पणी राहुल गांधी यांनी केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “भारत आता एक लाख कोटी रुपयांहून अधिक किंमतीचे मोबाइल निर्यात करणारा देश बनला आहे. काँग्रेस नेते भारताच्या यशाकडे दुर्लक्ष करण्याच्या मानसिक आजाराने ग्रासले आहेत.”
मूर्खांचे सरदार असा उल्लेख
राहुल गांधी यांचे नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “काँग्रेसच्या काही शहाण्यांनी टीका केली. भारतातील लोक चीनमधून आलेले मोबाइल वापरतात, असे त्यांनी सांगितले. अरे मूर्खांच्या सरदारा, तू कोणत्या जगात राहतोस? भारताच्या यशाकडे दुर्लक्ष करण्याच्या मानसिक आजाराने काँग्रेस नेत्यांना ग्रासले आहे. त्यांनी कोणता परदेशी चष्मा घातलाय, ज्यामुळे त्यांना भारत दिसत नाही, याचे मला आश्चर्य वाटते.” काँग्रेसवर टीका करत असतानाच पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, भारत आता मोबाइल उत्पादन करणारा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश बनला आहे. असं मोदी म्हणाले होते त्यावर आता राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.