राहुल गांधी कायमच हे म्हणताना दिसतात की, ‘मै नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान खोलने आया हूँ’ या टीकेला आता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी.नड्डा यांनी उत्तर दिलं आहे. राहुल गांधी ‘मोहब्बत की दुकान’ नाही तर द्वेष, तीरस्कार यांचा मेगा शॉपिंग मॉल चालवत आहेत असं जे. पी. नड्डांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे जे. पी. नड्डा यांनी?
“आपला भारत देश जेव्हा जेव्हा प्रगतीची नवी शिखरं गाठतो, जेव्हा जेव्हा भारतातल्या प्रमुखपदावर बसलेल्या व्यक्तीचा लौकिक जगभरात पोहचतो. सगळं जग जेव्हा त्यांना मानतं त्यावेळी काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांना हे सगळं पचनी पडत नाही. देशाचा गौरव वाढतो आहे हे त्यांना पटत नाही. करोना काळात जगातल्या इतर देशांच्या लसींचं त्यांनी कौतुक केलं. मात्र १०० देशांनी भारताकडून करोना प्रतिबंधक लसी घेतल्या. मात्र राहुल गांधींनी याच लसींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे राहुल गांधी मागतात, हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करता. वरुन सांगता, ‘नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान खोलने आया हूँ’ तुम्ही तिरस्कार आणि द्वेषाचा मेगा शॉपिंग मॉल उघडून बसला आहे.
‘त्या’ गँगला कुणी पाठिंबा दिला?
आज मी बोलतोय ते फक्त टीका करायची म्हणून म्हणत नाही. ‘अफझल हम शरमिंदा है तेरे कातील जिंदा है’ या घोषणा देणाऱ्यांना कुणी पाठिंबा दिला? ‘भारत ते टुकडे होंगे’ म्हणणाऱ्या तुकडे गँगस दुसऱ्या दिवशी कोण उभं होतं? द्वेषाचा शॉपिंग मॉल यांनी उघडला आहे हे जगाला माहित आहे. राहुल गांधी मोदींचा विरोध करता करता हे विसरतात की आपण भारत देशाचा स्वाभिमान धुळीस मिळवतो आहोत. हे तुमचं राष्ट्रीयत्व आहे का? तुम्ही काहीही बोललात तरी जगाला माहित आहे की प्रधानसेवक मोदींनी देशाला किती पुढे नेलं आहे. ” असं म्हणत नड्डा यांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा हे कायमच द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत अशी टीका राहुल गांधी यांनी वारंवार केली आहे. न्यूयॉर्कच्या भाषणातही राहुल गांधी असं म्हणाले की देशात सध्या दोन विचारधारांचा लढा सुरु आहे. एक विचारधारा महात्मा गांधींची आहे तर दुसरी विचारधारा ही नथुराम गोडसेची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नथुराम गोडसेच्या विचारधारेवर देश चालवत आहेत. अशी टीका राहुल गांधींनी केली होती. आता जे. पी. नड्डा यांनी टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.