Rahul Gandhi : मेक इन इंडिया ही चांगली कल्पना होती, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यासाठी प्रयत्नही केले. मात्र या योजनेला अपयश आलं आहे हे मान्यच करावं लागेल असं वक्तव्य लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुला गांधी यांनी केलं आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
आज देशात सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे बेरोजगारीचा. हे आपल्याला मान्यच करावं लागेल. राष्ट्रपतींनी जे अभिभाषण केलं त्यात बेरोजागारी, बेकारी हे शब्दही नव्हते. इंडिया आघाडीचं सरकार असतं तर राष्ट्रपतींचं भाषण असं नसतं असं राहुल गांधी म्हणाले, तसंच राहुल गांधी पुढे म्हणाले की मेक इन इंडिया ही चांगली कल्पना होती. मात्र आपण उत्पादनांमध्ये अपयशी ठरलो. त्याचा परिणाम अर्थातच नोकऱ्यांवर म्हणजेच रोजगारांवर झाला.
मागच्या साठ वर्षात उत्पादनाचा आलेख सर्वात खालवलेला
राहुल गांधी म्हणाले, मागच्या ६० वर्षात आपण उत्पादनाचा आलेख यावेळी सर्वाधिक खालावला आहे. मेक इन इंडियाचा उल्लेख करत राहुल गांधींनी स्मार्ट फोन दाखवला आणि म्हणाले की हा फोन भारतात तयार झाला आहे. मात्र या फोनचे सगळे सुटे भाग चीनमधून आले आहेत. आपण तो इथे फक्त जोडला आहे. सध्या भारतात असमानता वाढली आहे. सध्याच्या घडीला जग एका क्रांतीच्या दिशेने वाटचाल करतं आहे. ही क्रांती अणु उर्जेची आहे. याआधी जी क्रांती होती ते संगणक युग होतं. मी वाजपेयींचा सन्मान करतो, मात्र अटलबिहारी वाजपेयी संगणकाला हसले होते, या गोष्टीचं काय काम? वगैरे म्हणत या गोष्टीची खिल्ली उडवली गेली. पण आज संगणक ही काळाची गरज आहे. साधी गोष्ट लक्षात घ्या युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. इलेक्ट्रिक मोटर आणि इंजिन तयार केलं जातं तसंच एआयकडून डेटा ऑपरेट केला जातो. डेटा शिवाय काहीही करता येत नाही. भारताकडे सध्या कुठलाही डेटा नाही. एआयकडून चीन किंवा अमेरिकेच्या डेटाच्या वापर केला जातो असंही राहुल गांधी म्हणाले.
जगात होणाऱ्या बदलांबाबत भारत सजग नाही
जगात जे काही बदल होत आहेत त्याबाबत हे सरकार सजग नाही. आपल्याला पब्लिक स्कूलमध्येही बॅटरी आणि इंजिन या विषयांचं ज्ञान दिलं पाहिजे. या बाबतीत चीन आपल्यापेक्षा १० वर्षांनी पुढे आहे. पंतप्रधानांना अमेरिकेत बोलवलं जावं म्हणून आपण परराष्ट्र मंत्र्यांना अमेरिकेला पाठवत नाही असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं. राहुल गांधींच्या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांनी गोंधळ केला आणि गदारोळ घातला. राहुल गांधींना असं बोलणं शोभत नाही असं किरण रिजेजू यांनी म्हटलं आहे. तसंच लोकसभेत गंभीर विषयावर चर्चा सुरु आहे हे राहुल गांधींनी लक्षात घेतलं पाहिजे असंही रिजेजू म्हणाले. ज्यानंतर राहुल गांधी यांनी मी दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणत राहुल गांधी सॉरी म्हणाले.