माझा जन्म जैविकदृष्ट्या झालेला नसून मला ईश्वराने त्यांचे कार्य पूर्ण करण्यासाठी पाठविले आहे, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना केलं होतं. त्यांच्या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, या विधानावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केलं आहे. मोदींना परमेश्वराने गरिबांच्या कल्याणासाठी नाही तर अदाणी-अंबानी यांच्या मदतीसाठी पाठवलंय, अशी टीका त्यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “मी दैवी अंश, मी युद्ध रोखलं, अशा मुंगेरीलालच्या गोष्टी, पंतप्रधान नरेंद्र मोदी…”, सलमान खुर्शीद यांचा सवाल

नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?

“पंतप्रधान मोदी म्हणतात की त्यांचा जन्म आईवडिलांपासून झाला नाही, तर परमेश्वाराने त्यांना एका उद्देशाने पाठवलं आहे. त्यांच म्हणणं खरं आहे. परमेश्वराने त्यांना अदाणी-अंबानी यांच्या मदतीसाठी पाठवलं आहे. जर त्यांना खरंच परमेश्वराने पाठवलं असतं तर त्यांनी देशातील गरिबांसाठी आणि वंचितासाठी काम केलं असतं. मात्र त्यांच्या परमेश्वाराने त्यांना सांगितलं की जा आणि अदाणी अंबानींची मदत करा”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

यावेळी बोलताना त्यांनी संविधान बदल्याच्या मुद्द्यावरूनही मोदी सरकारवर टीका केली. “ही लढाई विचारधारेची लढाई आहे. एकीकडे इंडिया आघाडी आहे, तर दुसरीकडे ते लोक आहेत, ज्यांना संविधान बदलायचं आहे. भाजपाच्या नेत्यांनी संविधान बदलणार असल्याचे जाहीरपणे सांगितलं आहे. मात्र, जोपर्यंत इंडिया आघाडी आणि काँग्रेस आहे, तोपर्यंत आम्ही कधीही असं होऊ देणार नाही”, असे ते म्हणाले.

पुढे बोलताना, “बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे देशातील मागसवर्गीयांना त्यांचा हक्क मिळाला आहे. याच संविधानाने त्यांना आरक्षण दिलं आहे. मात्र, भाजपाला दलित-पीडितांचे आरक्षण रद्द करायचं आहे. इंडिया आघाडीचं सरकार आल्यास, आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यापेक्षा जास्त वाढवली जाईल”, असं आवश्वानही त्यांनी दिली.

हेही वाचा – “मोदी यांची प्रकृती बरी नाही, पण लक्षात कोण घेतो?” ठाकरे गटाचा मोदींना टोला

पंतप्रधान मोदींनी नेमकं काय म्हटलं होते?

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी मी ईश्वराचं कार्य पूर्ण करण्यासाठी आलो असल्याचं म्हटलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींना या मुलाखतीमध्ये महिला पत्रकाराने “तुम्ही एवढं काम करता तर थकत का नाहीत?” असा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना मोदींनी आपला जन्म जैविक प्रक्रियेतून झाला नसल्याचं विधान केलं. “मी आता या निष्कर्षापर्यंत पोहोचलो आहे की, माझा जन्म जैविकदृष्ट्या झालेला नाही. मला ईश्वराने त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी पाठविले आहे”, असं मोदी म्हणाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi said pm modi sent by god to help adani not poor uttar pradesh spb