Rahul Gandhi : संसदेत राहुल गांधींकडून धक्काबुक्की झाल्याचा आरोप भाजापच्या खासदारांनी केला आहे. प्रताप चंद्र सारंगी यांनी राहुल गांधी यांनी धक्का दिल्याचा आणि त्यामुळे आपण जखमी झाल्याचा आरोप केला आहे. दरम्यान काही वेळापूर्वीच राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केलं. मल्लिकार्जुन खरगेंनी त्यांनाच धक्काबुक्की झाल्याचा आरोप भाजपावर केला. त्यानंतर राहुल गांधींनी ( Rahul Gandhi ) सविस्तर भूमिका मांडली.

काय म्हणाले राहुल गांधी?

“संसदेत अधिवेशन सुरु होण्याआधी काही दिवस अदाणींच्या संदर्भातली अमेरिकेतली केस समोर आली. याबाबत कुठलीही चर्चा करण्यास भाजपाने नकार दिला. अशा प्रकारचा विषय थांबवण्याचा प्रयत्न केला. भाजपाचं धोरण हे होतं की या प्रकरणी कुठलीही चर्चा न होता ते दडपलं जावं. त्यासाठी त्यांनी विविध गोष्टी मधे आणून मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न केला. हे घडत होतंच त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांबाबत एक वक्तव्य केलं. आम्ही सुरुवातीपासूनच हे सांगत आहोत की भाजपाची आणि संघाची विचारधारा ही संविधान विरोधी आणि आंबेडकरांच्या विरोधातली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं जे योगदान आहे ते यांना पुसून टाकायचं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांची मानसिकता काय आहे ते त्यांच्या वक्तव्यातून दाखवून दिलं आहे.” असं राहुल गांधी ( Rahul Gandhi ) म्हणाले.

हे पण वाचा- Mallikarjun Kharge : “भाजपा खासदारांकडून आमच्यावर हल्ला, आमची खिल्ली उडवली…”, मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप

राहुल गांधी म्हणाले आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत

राहुल गांधी पुढे म्हणाले, “आम्ही हे सांगितलं होतं की अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, माफी मागावी. मात्र ते केलंच नाही. आज पुन्हा एकदा या लोकांनी विषयांतर करण्याचा सोयीस्कर प्रयत्न केला आहे. आम्ही सगळे खासदार शांततेत संसदेत चाललो होतो. त्यावेळी पायऱ्यांवर दंडुके घेऊन उभे होते. आम्हाला त्यांनी आत जाण्यापासून अडवलं हे वास्तव आहे. आम्ही आमच्या मागणीवर ठाम आहोत की गृहमंत्री अमित शाह यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे. त्यांनी माफी मागावी आणि पदाचा राजीनामा द्यावा. तसंच मुख्य मुद्दा हा आहे की नरेंद्र मोदींचे मित्र अदाणींचा. त्यांच्याविरोधात परदेशात केस झाली आहे. या गोष्टीपासून लक्ष विचलित केलं जातं आहे, हा मुद्दा यांना दडपून टाकायचा आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी सुरु आहेत. ” असा आरोप राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी केला आहे.

Story img Loader