राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचा उल्लेख ‘गद्दार’ असा केला होता. यामुळे गेहलोत आणि पायलट गटात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं. सचिन पायलट हे ‘गद्दार’ असून कधीही मुख्यमंत्री होणार नाही, असं वक्तव्य गेहलोत यांनी केलं. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाष्य करत दोन्ही नेते पक्षाची संपत्ती असल्याचं म्हणत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.
“अशोक गेहलोत आणि सचिन पायलट हे दोघेही पक्षासाठी बहुमूल्य संपत्ती आहे. राजस्थानमधील राजकीय परिस्थितीचा भारत जोडो यात्रेवर काही परिणाम होणार नाही. यात्रा राजस्थानात गेल्यावर तिचे भव्य स्वागत होईल, याची मला खात्री आहे,” असं राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर आता अशोक गेहलोत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
हेही वाचा : “स्मृती इराणींच्या प्रचारसभेला उपस्थित राहा”, शिक्षकाचा विद्यार्थ्यांना आदेश
‘भारत जोडो’ यात्रा डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला राजस्थानमध्ये प्रवेश करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते के सी वेणुगोपाल यांनी राजस्थानमधील परिस्थितीचा आढावा घेतला. तेव्हा मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट हे सुद्धा एकत्र आल्याचं दिसलं. त्यानंतर अशोक गेहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा : भारतीय लष्कराला मिळाला ‘अर्जुन’, पाकिस्तानातून येणाऱ्या ड्रोनची करणार ‘शिकार’
अशोक गेहलोत म्हणाले, “राहुल गांधी म्हणत असतील आम्ही पक्षाची संपत्ती आहोत, मग वाद कुठे आहे. आमच्या पक्षातील वरिष्ठ नेते बोलल्यावर कोणताही वाद आता राहिला नाही. राजस्थानमधील विधानसभा निवडणूक आम्ही जिंकू. आमच्या सरकारने जनतेसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्याचा फायदा राज्यातील जनतेला होत आहे. जेव्हा लोकांना भेटतो, तेव्हा त्यांचा उदंड प्रतिसाद मिळतो. याचा अर्थ राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेसचे सरकार येईल,” असेही गेहलोत यांनी म्हटलं.