काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज (मंगळवार, १२ मार्च) नंदुरबारमार्गे महाराष्ट्रात दाखल झाली आहे. ही पदयात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यावर नंदुरबारच्या सीबी मैदानावर राहुल गांधी यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत राहुल गांधी यांनी नंदुरबारसह देशभरातील आदिवासींसाठी मोठ्या घोषणा केल्या. तसेच केंद्रातलं मोदी सरकार देशातल्या आदिवासी समुदायावर अन्याय करत असल्याचं वक्तव्य केलं. राहुल गांधी म्हणाले, या देशात ८ टक्के आदिवासी नागरिक आहेत. परंतु, देशाच्या व्यवस्थेत, नोकऱ्यांमध्ये, संस्थांमध्ये आदिवासींची भागीदारी केवळ ०.१० टक्के इतकीच आहे. याला भाजपा सरकारची धोरणं कारणीभूत आहेत.
यावेळी केलेल्या भाषणात राहुल गांधी आदिवासी समुदायाला उद्देशून म्हणाले, भारतातल्या प्रसारमाध्यमांमध्ये आदिवासींचं स्थान काय आहे? माध्यमांमध्ये आदिवसांची किती भागीदारी आहे माहितीय का? भारतातल्या प्रसारमाध्यमांमध्ये एकही आदिवासी नाही. म्हणजेच या क्षेत्रात तुमचा शून्य टक्के वाटा आहे. देशात मोदी मीडिया, अदाणी मीडियाचं जाळं पसरलंय, त्यामुळे तिथे तुम्हाला कुठलाही वाटा मिळणार नाही. तसेच यात त्या पत्रकारांची काही चूक नाही. कारण ते लोक पगाराने बांधले आहेत. त्यांनी वरिष्ठांचं ऐकलं नाही तर त्यांना कामावरून काढून टाकलं जाईल. तुम्ही देशातल्या मोठ्या मीडिया कंपन्यांची यादी काढून पाहा, त्यांचे मालक पाहा, मोठ्या पत्रकारांची, अँकर्सची यादी पाहा, त्यात तुम्हाला आदिवासी प्रतिनिधी दिसणार नाहीत. या माध्यमांच्या मालकांमध्येही कोणी आदिवासी आहेत का? याचाच अर्थ माध्यमांमध्ये तुमची भागीदारी शून्य आहे. कारण तिथे तुमचा एकही प्रतिनिधी नाही.
राहुल गांधी म्हणाले, माध्यमांमध्ये तुमचा एकही प्रतिनिधी नसल्याने तिथे तुमचा जमीन, जल, जंगलाचा मुद्दा दिसणार नाही. समाजमाध्यमांवर कुठेतरी त्याची चर्चा होऊ शकते. समाज माध्यमांवर मी नुकताच एक व्हिडीओ पाहिला. भाजपाच्या नेत्याने एका आदिवासी तरुणाच्या तोंडावर लघूशंका केल्याचं त्या व्हिडीओमध्ये दिसतंय. कदाचित तुम्हीदेखील तो व्हिडीओ पाहिला असेल. मी समाजमाध्यमांवर तो व्हिडीओ पाहिला. परंतु, याची बातमी प्रसारमाध्यमांवर दाखवली गेली नाही, दाखवली जाणारही नाही. कारण ही माध्यमं भाजपाच्या ताब्यात आहेत.
हे ही वाचा >> राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं महाराष्ट्रात आगमन, नंदुरबारमधून आदिवासींसाठी केल्या पाच मोठ्या घोषणा
१४ वर्षांनंतर गांधी घराण्यातील सदस्य नंदुरबारमध्ये
ज्या नंदुरबार जिल्ह्यावर गांधी घराण्याचे विशेष प्रेम राहिले आहे, त्या नंदुरबारकडे २०१० नंतर गांधी घराण्याचा एकही सदस्य फिरकला नाही. त्यामुळेच की काय तब्बल १४ वर्षानंतर राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून नंदुरबारमध्ये आल्याने स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.