काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी सध्या लडाख दौऱ्यावर आहेत. पँगॉन्ग लेकवर राहुल गांधी यांनी त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. तसेच या भागात राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या प्रार्थना सभेला राहुल यांनी हजेरी लावली. प्रार्थना सभेनंतर राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी राहुल गांधी म्हणाले, मला इथल्या लोकांनी सांगितलं, चीनचं सैन्य भारतीय सीमेत घुसलं आहे. दुसऱ्या बाजूला आपलं सरकार आणि आपले पंतप्रधान दावा करत आहेत की आपली एक इंचही जमीन गेलेली नाही.
राहुल गांधी म्हणाले इथले लोक त्यांच्या गायी-म्हशींना ज्या ठिकाणी चरण्यासाठी घेऊन जात होते ती जमीन (चरई क्षेत्र) चीनने बळकावली आहे. त्यामुळे हे लोक तिकडे त्यांची जनावरं नेऊ शकत नाहीत. लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे. परंतु, जनतेचं गाऱ्हाणं सरकार ऐकत नाही, आम्ही ते ऐकून घेऊ. यावेळी राहुल गांधी यांनी त्यांचे वडील दिवंगत राजीव गांधी यांचं स्मरण केलं. ते म्हणाले, माझे वडील हे माझ्या महान शिक्षकांपैकी एक होते.
यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राहुल गांधी यांना लडाखला येण्याचं कारण विचारलं, त्यावर राहुल गांधी म्हणाले, भारत जोडो यात्रेदरम्यान, मला लडाखला जायचं होतं, परंतु, काही कारणास्तव ते शक्य झालं नाही. त्यामुळे मी आत्ता इथे आलो आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले, लडाखमधील नागरिकांच्या सरकारविरोधात अनेक तक्रारी आहेत. त्यांना दिलेल्या दर्जामुळे ते खूश नाहीत. लडाखच्या जनतेला प्रतिनिधित्व हवं आहे. त्यांना वाटतं की त्यांचा हा प्रदेश नोकरशहांनी नव्हे तर जनतेने चालवावा, त्यांच्या प्रतिनिधिंनी चालवावा.
हे ही वाचा >> दादा भुसे आणि आदित्य ठाकरेंची नाशकात गुप्त भेट? जयंत पाटील म्हणाले, “सगळीच माणसं आपल्या…”
राहुल गांधी म्हणाले, तुम्ही इथल्या कुठल्याही व्यक्तिला विचारा, ते सांगतील की चीनचं सैन्य भारताच्या हद्दीत घुसलंय. त्यांनी आपली जमीन हिसकावली आहे. पंतप्रधान म्हणतायत की आपली एक इंचही जमीन गेलेली नाही, परंतु ते सत्य नाही. इथले लोक काय म्हणतायत ते तुम्ही ऐका. तुम्ही इथल्या कोणालाही विचारू शकता.