काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी गुजरातमधील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या भेटी घेतल्या. गुजरात दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी राजकोट गेम झोन दुर्घटना, मोरबी पूल दुर्घटना आणि सुरत दुर्घटनेमधील पीडितांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तसेच राज्यातील भाजपा सरकारवर टीका केली. राहुल गांधी म्हणाले, “आम्ही गुजरातमध्ये भाजपाला पराभूत करणार आहोत. काँग्रेसचा कुठलाही कार्यकर्ता कोणालाही घाबरत नाही.”
विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, भाजपा ही आजवर केवळ राम मंदिर आणि अयोध्येच्या राजकारणावर पुढे सरकत आली आहे. या राम मंदिरासाठी लालकृष्ण अडवाणी (ज्येष्ठ भाजपा नेते) यांनी पहिलं आंदोलन सुरू केलं. त्यानंतर त्यांनी रथयात्रा देखील काढली होती. असं म्हटलं जातं की, मोदींनी त्या रथयात्रेत अडवाणी यांची मदत केली होती. मी परवा संसदेत बसून विचार करत होतो, मोदींनी राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गौतम अदाणी, मुकेश अंबानी या व्यावसायिकांना बोलावलं होतं. परंतु, तिथे कुठेही गोरगरीब दिसले नहीत. संसदेत मी अयोध्येच्या खासदारांना विचारलं की भाजपाने गेल्या अनेक दशकांपासून राम मंदिराचं राजकारण केलं. त्यांनी इतकी वर्ष जे दावे केले होते ते पूर्ण करत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली मात्र अयोध्येतील जनतेने इंडिया आघाडीचा स्वीकार करत आपल्याला तिथे जिंकवलं. हे नेमकं कसं शक्य झालं?
राहुल गांधी म्हणाले, मला अयोध्येच्या खासदारांनी (अवधेश प्रसाद) सांगितलं, राहुलजी मला समजलं होतं की मला अयोध्येतून लोकसभेचं तिकीट मिळू शकतं. मतदारसंघातलं वारं फिरलं होतं त्यामुळे आपण या मतदारसंघातून जिंकू शकतो याची खात्री पटली होती. मला अयोध्येतील लोक सांगायचे की मंदिर बांधण्यासाठी सरकारने त्यांची जमीन घेतली. अनेक दुकानं व घरं पाडली. मात्र, मंदिर बांधून झालं, प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला तरी त्या लोकांना अद्याप भरपाई दिलेली नाही. अयोध्येत मोठं विमानतळ बांधण्यात आलं. या विमानतळासाठी सरकारने शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमीन ताब्यात घेतली. त्या शेतकऱ्यांनाही भरपाई दिलेली नाही. मंदिर आणि विमानतळासाठी स्थानिकांनी इतका मोठा त्याग केलेला असताना स्थानिक नागरिकांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून दूर ठेवलं होतं.
हे ही वाचा >> विरोधकांकडून जातनिहाय जनगणनेची मागणी; पण एनडीएच्या नायडूंकडून ‘स्किल सेन्सस’चा पर्याय
काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, आता आपण यांना (भाजपा) धडा शिकवू, गुजरातमध्ये सत्तांतर घडवून आणू. नरेंद्र मोदी वाराणसी नव्हे तर अयोध्येतून लोकसभा निवडणूक लढवणार होते. परंतु, पराभवाच्या भितीने ते अयोध्येतून निवडणूक लढले नाहीत. अयोध्येत आम्ही त्यांच्या उमेदवाराला पराभूत केलं. आता आम्ही गुजरातमध्ये त्यांना हरवणार. मी गुजरातमधील सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना एकच गोष्ट सांगेन. तुम्ही कोणालाही घाबरू नका, आपण गुजरातमध्ये यांना पराभूत करणार आहोत.