बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडून भाजपासह सरकार स्थापन केल्यानंतर आज पहिल्यांदाच राहुल गांधी यांनी त्यांच्यावर जाहीर भाष्य केले. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा बिहारमध्ये पोहोचली आहे. बिहारच्या पुर्णिया जिल्ह्यात आज जाहीर सभेला संबोधित करत असताना राहुल गांधी यांनी नितीश कुमार यांच्यावर टीकास्र सोडले. नितीश कुमार इंडिया आघाडीतून बाहेर का पडले? याचे कारण सांगतानाच राहुल गांधी यांनी नितीश कुमार यांच्या कोलांटउड्याबाबत बिहारमध्ये एक विनोद तयार झाला असल्याचेही सांगितले.
“नितीश कुमार कुठे फसले? हे मी तुम्हाला सांगतो. बिहारमध्ये जातनिहाय सर्व्हे करावा, अशी मागणी आम्ही नितीश कुमार यांच्याकडे केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने नितीश कुमार यांच्यावर दबाव टाकून सर्व्हे करून घेतला. पण दुसऱ्या बाजूनेही त्यांच्यावर दबाव आला. कारण भाजपाला या देशात जातनिहाय सर्व्हे करायचा नाही. या देशात दलित, आदिवासी, वंचित यांची संख्या किती? हे भाजपाला जाणून घ्यायचे नाही. त्यामुळे भाजपाच्या दबावापुढे नितीश कुमार झुकले. भाजपाने त्यांना मार्ग दाखविला आणि नितीश कुमार त्या मार्गाने चालू पडले”, असे भाष्य राहुल गांधी यांनी जाहीर सभेत केले.
राहुल गांधी पुढे म्हणाले, “भाजपाला सामाजिक न्यायाचे तत्त्व मान्य नाही. पण इंडिया आघाडी म्हणून आम्ही सामाजिक न्यायाची भूमिका मांडत राहू आणि त्यासाठी आम्हाला नितीश कुमार यांची गरज नाही.” राहुल गांधी यांनी यावेळी म्हणाले की, आम्ही देशातील बेरोजगारी आणि आर्थिक विषमतेकडेही लक्ष वेधले. सत्ताधारी भाजपा या प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी द्वेषाची पेरणी करत आहे. ज्यामुळे सामाजिक आणि आर्थिक विषयाकडून दुर्लक्ष होत असल्याचीही टीकाही राहुल गांधी यांनी केली.
या जाहीर सभेत राहुल गांधी यांनी नितीश कुमार यांच्याबाबतचा एक विनोदही ऐकून दाखविला. ते म्हणाले, “बिहारचे मुख्यमंत्री राज्यपालांकडे शपथविधीसाठी गेले. खूप धामधूम सुरू होती. भाजपाचे नेते, राज्यपाल आणि आमदार त्याठिकाणी बसले होते. नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतात आणि सर्वांची सदिच्छा भेट घेऊन निघून जातात. रस्त्यात त्यांना आठवते की, त्यांची शाल राज्यपाल भवनातच राहिली. ते चालकाला सांगतात की, पुन्हा राज्यपाल भवनात चल. चालक वाहन वळवतो आणि राज्यपाल भवनाकडे निघतो. नितीश कुमारांना पुन्हा आलेले पाहून राज्यपाल म्हणतात, इतक्या लवकर परत (शपथविधीसाठी) आलात.”
“बिहारची अवस्था अशी आहे की, मुख्यमंत्र्यांवर थोडासा दबाव पडला तरी ते यु-टर्न घेतात”, अशी बोचरी टीका राहुल गांधी यांनी केली.