पंतप्रधान होण्यात आपणांस स्वारस्य नाही. त्यामुळे पंतप्रधानपदावरून विचारला जाणारा प्रश्नच अप्रस्तुत आहे, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात हरयाणातील काँग्रेसच्या खासदारांसोबत झालेल्या अनौपचारिक चर्चेदरम्यान स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी आणि भाजपचे नरेंद्र मोदी यांच्यात जबरदस्त चुरस असेल, अशी वातावरण निर्मिती केली जात असताना राहुल गांधी यांनी पंतप्रधानपदात आपल्याला स्वारस्य नसल्याचे सांगून त्या चर्चेतील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला आहे. नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे वॉर्टन विद्यापीठाच्या विद्याथ्यार्ंपुढे भाषण देण्याचे निमंत्रण राहुल गांधी यांनाही आले. पण राहुल गांधी यांनी हे निमंत्रण स्वीकारले नाही.  
काँग्रेस संघटना मजबूत करण्यालाच आपले सर्वोच्च प्राधान्य आहे. पंतप्रधानपदाला नाही, असे राहुल गांधी म्हणाले. ही चर्चा सुरू असताना काही पत्रकारही तिथे उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाला सज्ज करताना राहुल गांधी विविध राज्यांतील प्रदेश काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांंशी संवाद साधत आहेत. राहुल गांधी यांनी या संवादादरम्यान आपल्या खासदारांपाशी काही गोष्टी स्पष्ट केल्या. आपण दीर्घकालीन राजकारणात विश्वास ठेवतो आणि ‘पक्षश्रेष्ठी’ संस्कृती आपल्याला पसंत नसल्याचे त्यांनी सांगितले. अन्य नेत्यांसारखा आपला राजकीय प्रवास तळागाळातून झाला नसल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली. पुढच्या दहा वर्षांंत काँग्रेसचा चेहरा बदलण्याचा दृढसंकल्पही त्यांनी व्यक्त केला. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत परतला तर पंतप्रधान कोण होईल यावर टिप्पणी करता येणार नाही, असे पक्षसंघटना मजबूत करण्यावरच लक्ष केंद्रीत करणाऱ्या राहुल गांधींनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले.
देशातील काही पक्षांचे नियंत्रण एकाच व्यक्तीच्या हाती आहे. काही पक्षांचे चार-पाच नेत्यांकडे आहे, तर काँग्रेससारख्या पक्षात ते १५-२० नेत्यांकडे आहे. अशा स्थितीत पक्षातील मध्यमश्रेणीच्या नेत्यांना अधिकारसंपन्न करण्याची योजना त्यांनी सहकाऱ्यांपुढे मांडली. काँग्रेसमधील मोजक्या लोकांना सक्षम करण्याऐवजी पक्षाचे विकेंद्रीकरण करून जास्तीत जास्त लोकांना सक्षम करण्यावर आपण भर देत असल्याचे सांगून पक्ष संघटनेत वरपासून खालपर्यंत मोठे बदल घडवून आणणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. समाजातील प्रत्येक घटकाला प्रेरित करणारे महात्मा गांधी आपले गुरू आहेत, असेही ते म्हणाले. नजीकच्या भविष्यात विवाहाच्या बंधात अडकणार नसल्याचेही संकेत त्यांनी या वेळी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा