टीआरएससोबत काँग्रेसची कोणतीही युती होणार नाही, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं. राहुल गांधी यांनी तेलंगणातील सत्ताधारी पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीसोबत युतीची कोणतीही शक्यता नाकारली आहे. यावेळी बोलताना त्यांनी टीआरएसचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आणि ते मुख्यमंत्री नसून लोकांचा आवाज न ऐकणारा राजा आहे, अशी टीका केली.

‘रयथू संघर्ष सभेला’ संबोधित करताना शेतकऱ्यांसाठी काँग्रेसला पाठिंबा देण्याचे आवाहन राहुल गांधींनी केले. राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन होताच दोन लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी MSP म्हणजेच किमान आधारभूत किंमत देऊ, असंही राहुल गांधी म्हणाले.

यावेळी राहु गांधी यांनी पक्षाची वारंगल घोषणा देखील जारी केली. ज्यात शेतकरी कर्जमाफी दिली जाईल. तसेच टीआरएस सरकारकडून दिल्या जाणाऱ्या १० हजार रुपयांच्या तुलनेत शेतकऱ्यांना प्रति एकर १५ हजार रुपये वाढीव नुकसान भरपाई दिली जाईल. तसेच MSP वर सर्व पिकांची खरेदी करण्याचे आणि सर्व साखर कारखाने सुरू करण्याचे आश्वासन दिले.

“आज असं म्हटलं जातं की तेलंगणात मुख्यमंत्री आहे, पण खरं तर तो मुख्यमंत्री नसून ‘राजा’ आहे, जो लोकांचा आवाज ऐकत नाही तर फक्त स्वतःचं ऐकतो. कोणताही मुख्यमंत्री लोकांचे म्हणणे ऐकून निर्णय घेतो पण राजाला लोकशाहीशी काही देणेघेणे नसते आणि त्याला जे वाटते तेच करतो,” असे म्हणत राहुल गांधींनी केसीआर यांच्यावर टीका केली.

पुढे जाऊन काँग्रेस आणि तेलंगणा राष्ट्र समितीसोबत (टीआरएस) कोणतीही युती करणार नाही आणि पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि केसीआर यांच्या नेतृत्वाखालील पक्ष यांच्यात थेट लढत होईल, असे राहुल गांधी म्हणाले.