Rahul Gandhi on Gautam Adani US charges 250 million USD bribe plot : भारताच्या सरकारी अधिकाऱ्यांना दोन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची लाच देणे, गुंतवणूकदार आणि बँकाँशी खोटे बोलणे आणि त्यातून अब्जावधी रुपये गोळा केल्याचा आरोप अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील सरकारी वकिलांनी भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी यांच्यावर केला आहे. त्यामुळे आता गौतम अदाणी यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच गेल्या अनेक वर्षांपासून गौतम अदाणी व त्यांच्या कंपनीवर टीका करणारे, घोटाळ्यांचे आरोप करणारे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की इतकं सगळं करूनही गौतम अदाणी यांना अटक होणार नाही.
राहुल गांधी म्हणाले, “भाजपाला मिळणारा सगळा निधी हा अदाणींकडून येतो. भाजपाचे आर्थिक व्यवहार त्यांच्याच हातात आहेत. पंतप्रधानांनी ठरवलं तरी ते अदाणींवर कुठल्याही प्रकारची कारवाई करू शकत नाहीत. अदाणी यांनी देश बळकावला आहे. देश त्यांच्या मुठीत आहे. देशातील विमानतळं, बंदरं, संरक्षण यंत्रणा अदाणींच्या ताब्यात आहे. सगळीकडे अदाणींची केंद्र सरकारबरोबर भागिदारी आहे. एका बाजूने अदाणी आणि दुसऱ्या बाजूने नरेंद्र मोदी मिळून आपला देश लुटत आहेत. मोदी व भाजपा त्यांच्या पापात सहभागी आहेत. त्यामुळे मोदी त्यांना अटक करणार नाहीत. मुळात मोदींमध्ये तेवढी हिंमत व क्षमता नाही. कारण ज्या दिवशी मोदी व आपलं सरकार गौतम अदाणी यांना अटक करेल. त्या दिवशी मोदी देखील तुरुंगात जाऊ शकतात”.
हे ही वाचा >> Gautam Adani Fraud: गौतम अदाणींनी कंत्राट मिळविण्यासाठी २,००० कोटी रुपयांची लाच दिली; अमेरिकेत गुन्हा दाखल, शेअर बाजार गडगडला
अदाणींविरोधात शिवसेना (ठाकरे) आक्रमक
अमेरिकेत अदाणींविरोधात अटक वॉरंट निघालंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सुत्रं हाती घेतल्यानंतर अदाणींविरोधात वॉरंट काढण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील अनेक निविदा गौतम अदाणींनी बळकावण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले, “ट्रम्प सरकारने अदाणींविरोधात अटक वॉरंट काढलं आहे. ही मोदी व भाजपासाठी शरमेची गोष्ट आहे. अदाणीमुळे या देशाला एक डाग लावला आहे. म्हणून, आम्ही महाराष्ट्राला अदाणीराष्ट्र बनू देणार नाही.”
हे ही वाचा >> ‘निज्जरच्या हत्येची पंतप्रधान मोदींना कल्पना होती’, कॅनडातील वृत्तपत्राने दिलेल्या बातमीवर भारताचे जोरदार प्रत्युत्तर
नेमकं प्रकरण काय?
न्यूयॉर्कच्या ईस्टर्न डिस्ट्रिक्ट, यूएस ॲटर्नी कार्यालयाने यासंबंधी एक प्रसिद्धी पत्रक काढलं आहे. यूएस अतिरिक्त सहायक ॲटर्नी जनरल लिसा एच मिलर यांनी सांगितले, “भारताच्या सरकारी अधिकाऱ्यांना दोन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची लाच देणे, गुंतवणूकदार आणि बँकाँशी खोटे बोलणे आणि अब्जावधी रुपये त्यातून गोळा करण्याचा आरोप गौतम अदाणी आणि इतरांवर ठेवण्यात आला आहे.”