बिहारच्या पाटणा शहरात देशभरातल्या विरोधकांची बैठक होत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशभरातल्या वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांना या बैठकीसाठी निमंत्रित केलं आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि माजी खासदार राहुल गांधी या बैठकीसाठी पाटणा येथे दाखल झाले आहेत. या बैठकीआधी राहुल गांधी यांनी उपस्थितांसमोर एक भाषण केलं. या भाषणात त्यांनी भारतीय जनता पार्टीवर हल्लाबोल केला.
राहुल गांधी म्हणाले, देशात फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. परंतु काँग्रेस मात्र लोकांना जोडण्याचं काम करत आहे. आम्ही देशात प्रेम पसरवण्याचं काम करत आहोत. तिरस्काराला तिरस्काराने संपवता येणार नाही. त्यासाठी प्रेमाची आवश्यकता आहे. कारण प्रेमच या तिरस्काराला संपवू शकतं. म्हणून आम्ही प्रेमाच्या गोष्टी करत आहोत.
राहुल गांधी म्हणाले, आज येथे सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. एकत्र येऊन आम्ही भाजपाला हरवणार आहोत. कर्नाटकमध्ये भाजपावाल्यांनी मोठी भाषणं केली, ते कर्नाटकच्या प्रत्येक कोपऱ्यात गेले. परंतु त्यातून काय साध्य झालं ते तुम्ही सर्वांनी पाहिलंच आहे. कर्नाटकचा निकाल आपण पाहतोय. हे भाजपावाले म्हणत होते की त्यांचा मोठा विजय होईल. परंतु काँग्रेस उभी राहिली आणि विजयी झाली.
माजी खासदार राहुल गांधी म्हणाले, आगामी काळात तुम्हाला तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये भाजपा दिसणार नाही, केवळ काँग्रेस दिसेल. कारण काँग्रेस गरीबांबरोबर उभी आहे. नरेंद्र मोदी आणि भाजपावाले सत्तेत आले की केवळ दोन-तीन लोकांचा फायदा होतो. देशाची सगळी संपत्ती या लोकांना मिळते. परंतु काँग्रेस ही गोरगरीबांबरोबर आहे.
हे ही वाचा >> “आजच चमत्कार…”, विरोधकांच्या बैठकीआधी संजय राऊतांचं वक्तव्य, म्हणाले, “२०२४ च्या निवडणुकीआधी…”
ठाकरे-पवार बैठकीसाठी रवाना
पाटण्यातल्या विरोधकांच्या बैठकीसाठी महाराष्ट्रातून सहा मोठे नेते रवाना झाले आहेत. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष आणि खासदार प्रफुल्ल पटेल, कार्यध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे या बैठकीला उपस्थित असतील.