काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी दोन दिवसांच्या खासगी दौऱ्यावर काश्मीरला गेले आहेत. त्यांनी बुधवारी उत्तर कश्मीरमधील गुलमर्ग येथे स्कीइंगचा आनंद लुटला. राहुल गांधी यांनी नुकतीच भारत जोडो यात्रा पूर्ण केली. श्रीनगरमध्ये त्यांच्या भारत जोडो यात्रेचा समारोप झाला. गुलमर्गला जाताना राहुल गांधी काही काळ तंगमार्ग येथे थांबले. परंतु येथे राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बातचित करण टाळलं. त्यांनी केवळ पत्रकारांना नमस्कार केला आणि ते पुढे निघून गेले.
गुलमर्गमध्ये राहुल गांधी यांनी गोंडोलो केबल कार चालवली, त्यानंतर त्यांनी स्कीइंगचा आनंद घेतला. तसेच तिथे फिरायला आलेल्या अनेक पर्यटकांसोबत राहुल गांधी यांनी फोटोदेखील काढले. फरहात नाईक या युजरने राहुल यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, भारत जोडो यात्रेच्या यशानंतर राहुल गांधी गुलमर्गमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहेत.
गुलमर्ग येथे राहुल यांनी प्रशिक्षकांसह स्कीइंग केली. येथे आलेल्या पर्यटकांसोबत सेल्फी काढले. परंतु यामुळे राहुल यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी हे खासगी दौऱ्यावर असून ते काश्मीर खोऱ्यातील एका खासगी कार्यक्रमाला देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा >> Earthquake Philippines: टर्की, न्यूझीलंडपाठोपाठ आता फिलीपीन्स हादरलं, ६.१ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के
३,९७० किलोमीटरचा पायी प्रवास
राहुल यांनी नुकतीच भारत जोडो यात्रा पूर्ण केली. ७ सप्टेंबर २०२२ रोजी कन्याकुमारी येथून त्यांनी चालायला सुरूवात केली होती. त्यानंतर तब्बल पाच महिने चालत ते काश्मीरला पोहोचले. ३० जानेवारी रोजी त्यांनी श्रीनगर येथे त्यांच्या भारत जोडो यात्रेची सांगता केली. १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधून तब्बल ३,९७० किलोमीटर इतका पायी प्रवास करून राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा पूर्ण केली होती.