काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे लवकरच पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारणार असल्याची अटकळ बांधली जात होती, मात्र अशी शक्यता पक्षाने फेटाळून लावली असून काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी या बाबत मौन पाळले.
सोनिया गांधी या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आपल्या रायबरेली मतदारसंघात आल्या आहेत. राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्ष व्हावे अशी काँग्रेसच्या अनेक नेत्यांची इच्छा असल्याचे वृत्त माध्यमांतून आले आहे याकडे सोनिया यांचे वार्ताहरांनी लक्ष वेधले, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून गाडीत बसून त्या निघून गेल्या.
आमचा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामध्ये काही पद्धत आहे, सोनिया आणि राहुल गांधी यांचा प्रश्न येईल तेव्हा आम्ही सर्व जण त्याचा स्वीकार करू, राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावे अशी आमची सर्वाची इच्छा आहे, मात्र जेव्हा निर्णय होईल तेव्हा आम्ही तो योग्य प्रकारे जाहीर करू, असे पक्षाच्या प्रवक्त्या सुष्मिता देव यांनी वार्ताहरांना सांगितले.

‘नेतृत्व बदलण्याची गरज’
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारण्याची योग्य वेळ आली असल्याचे मत पंजाब काँग्रेसचे प्रमुख कॅ. अमरिंदर यांनी व्यक्त केले आहे. प्रियंका गांधी-वढेरा यांनी सक्रिय राजकारणात येण्यासही अमरिंदर यांनी अनुकूलता दर्शविली आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी या हुशार नेत्या आहेत, गेल्या २० वर्षांपासून त्या पक्षाची धुरा वाहात आहेत, पक्षाची सूत्रे नव्या पिढीकडे सोपविण्याची वेळ आली आहे असे त्यांना वाटले तर त्या अध्यक्षपद सोडतील आणि आम्ही राहुल गांधी यांना पूर्ण पाठिंबा देऊ, असेही अमरिंदर म्हणाले. सोनिया गांधी यांनी या प्रश्नावर आपल्याशी चर्चा केलेली नाही, मात्र सूत्रे नव्या पिढीकडे सोपविण्याची वेळ आली आहे, असे त्यांना वाटत असल्याचे आम्हाला कळले आहे, असेही ते म्हणाले.

Story img Loader