काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’चा महाराष्ट्रातील प्रवास संपला आहे. ही यात्रा आता मध्यप्रदेशात प्रवेश करेल. मात्र, राहुल गांधी गुजरात निवडणुकीसाठी प्रचाराला जाणार असल्याने दोन दिवस यात्रेला विश्रांती देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या सीमेवर यात्रा येण्यापूर्वी तेलंगणात राहुल गांधींनी एका यूट्यूबरशी संवाद साधला आहे. तेव्हा लहापणींच्या आठवणींना राहुल गांधींनी उजाळा दिला आहे. राहुल गांधींनी लहान असताना आई सोनिया गांधी यांना मी सुंदर दिसतो का? असं विचारले होते. त्यावर सोनिया गांधींनी ठिकठाक दिसतो, असं उत्तर दिल्याचं सांगितलं.

यूट्यूबर समदीश भाटीया याच्याशी बोलताना राहुल गांधी लहानपणींच्या आठवणी आणि ‘भारत जोडो यात्रा’ यावर मोकळेपणाने संवाद साधला. राहुल गांधींनी एक किस्सा सांगताना म्हटलं की, “लहान असताना आईला विचारले मी सुंदर दिसतो का? त्यावर आई म्हणाली तू ठिकठाक दिसतो. माझी आई अशीच आहे, ती लगेच तुम्हाला आरसा दाखवते. माझे वडील असेच होते. संपूर्ण कुटुंब असेच आहे.”

हेही वाचा : “इंदिरा गांधींची सत्ता गेली, एक दिवस मोदीही जातील, त्यामुळे…”, माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचा हल्लाबोल

समदीशने विचारले की तुमचे शूज खरेदी कोण करते. त्यावर राहुल गांधी म्हणाले, “मी स्वत: माझ्यासाठी शूज खरेदी करतो. नाहीतर आई किंवा बहीण शूज खरेदी करतात. काही राजकीय मित्रही मला शूज पाठवतात.” भाजपावाले तुम्हाला शूज पाठवतात का? यावर “ते माझ्यावर शूज फेकतात,” असं भन्नाट उत्तर राहुल गांधींनी दिलं आहे.

Story img Loader