काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी लोकसभेत बोलताना केंद्र सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली. “तुम्ही एका अत्यंत धोकादायक गोष्टीशी खेळत आहात. माझा तुम्हाला सल्ला आहे की थांबा. कारण जर तुम्ही थांबला नाहीत, तर तुम्ही समस्या निर्माण कराल”, असं म्हणत राहुल गांधींनी जम्मू-काश्मीर, पूर्वेकडील राज्य, तामिळनाडू यांचा संदर्भ दिला. मात्र, यानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना राहुल गांधींनी केलेल्या कृतीवर थेट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीच त्यांना सुनावलं.
नेमकं काय झालं?
मंगळवारी राहुल गांधींनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान केंद्र सरकारवर टीका करणं सुरूच ठेवलं होतं. यावेळी राहुल गांधींनी भाजपा खासदार कमलेश पासवान यांना एक चांगले दलित नेते असून चुकीच्या पक्षात असल्याचं म्हटलं. “पासवान हे अनुसूचित जातीतून आले आहेत. त्यांचा मला अभिमान वाटतो. दलितांवर झालेल्या ३ हजार वर्षांचा इतिहास त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते चुकीच्या पक्षात आहेत,” असं राहुल गांधी म्हणाले. मात्र, याचवेळी राहुल गांधी यांनी केलेल्या कृतीमुळे संतप्त होत ओम बिर्ला यांनी राहुल गांधींना सुनावलं.
राहुल गांधी म्हणतात, “मी एक लोकशाहीवादी व्यक्ती!”
राहुल गांधींच्या वक्तव्यावर कमलेश पासवान यांनी आपली नाराजी व्यक्त करण्याचा प्रयत्न केला. यावेळी “मी एक लोकशाहीवादी व्यक्ती आहे आणि मी इतर व्यक्तींना बोलण्याची संधी देतो”, असं म्हणत राहुल गांधीनी पासवान यांच्या दिशेने बोलण्यासाठी इशारा केला.
पण यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला संतप्त झाले. “इतर कुणाला बोलण्याी परवानगी देणारे तुम्ही कोण? तुम्ही कुणालाही परवानगी देऊ शकत नाही. हा अधिकार माझा आहे”, असं ओम बिर्ला म्हणाले.
“मला आनंदी करेल इतकी काँग्रेसमध्ये क्षमता नाही”
दरम्यान, राहुल गांधींचं भाषण संपल्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी जेव्हा कमलेश पासवान यांना बोलण्याची संधी दिली तेव्हा त्यांनी काँग्रेसची सरकारं फूट पाडा आणि राज्य करा धोरणं राबवत असल्याचा आरोप करत म्हटलं की, भाजपाने त्यांना खूप काही दिलं आहे. तीन वेळा खासदार बनवलं असून यांच्या पक्षाची (काँग्रेसची) इतकी क्षमता नाही की ते मला पक्षात घेऊन आनंदी ठेवू शकतील. काँग्रेसचे दलितांबद्दल धोरण काय आहे, हेही मला माहीत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी सल्ला देऊ नये, असे प्रत्युत्तर पासवान यांनी दिले.