संसदेचं हिवाळी अधिवेशन संपलं तरी खासदारांच्या निलंबनावरून जोरदार घमासान चालू आहे. विरोधी पक्ष केंद्र सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. इंडिया आघाडीतले पक्ष राजधानी दिल्लीसह देशभरात ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीदेखील केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी म्हणाले, आपल्या देशात आता बोलण्याचं स्वातंत्र्य राहिलं नाही. देशभरात प्रचंड बेरोजगारी आहे. हे बेरोजगार तरुण सरकारविरोधात आक्रमक होऊ लागले आहेत. संसदेची सुरक्षा भेदून दोन तरुणांनी लोकसभेत घुसून केलेल्या राड्याचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संसदेतल्या घुसखोरी प्रकरणावरून सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत राहुल गांधी म्हणाले, संसदेच्या सुरक्षेचा मुद्दा तर आहेच, परंतु त्या तरुणांनी हे आंदोलन का केलं? बेरोजगारी हे त्यामागचं प्रमुख कारण आहे. देशातले तरुण मोबाईलवर किती वेळ वाया घालवतात ते एकदा तपासून पाहा. मी याबद्दल एक सर्वेक्षण करण्यास सुचवलं होतं. एका संस्थेने हे सर्वेक्षण केलं. त्यातून समोर आलं की देशातले तरुण दिवसातले तब्बल साडेसात तास (सात तास ३० मिनिटे) मोबाईलवर वेळ घालवतात. कारण मोदीजींनी त्यांना रोजगार दिलेला नाही. बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत ते तरुण संसदेत घुसले होते.

खासदारांच्या निलंबन प्रकरणावर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले, काही दिवसांपूर्वी संसद भवन परिसरात तीन-चार तरुण घुसले होते. त्यापैकी दोघांनी सभागृहात उड्या मारल्या. त्यांना उड्या मारताना आम्ही सर्वांनी पाहिलं. ते आत आले, त्यांनी थोडा धूर पसरवला तेव्हा भाजपाचे सगळे खासदार पळून गेले. जे स्वतःला मोठे देशभक्त म्हणवत होते, तेच सर्वात जास्त घाबरले होते. ते तरुण आत कसे आले? त्यांनी स्मोक कॅन तिथे कसे आणले? त्यांनी हे आंदोलन का केलं? त्यांच्या आंदोलनाचं कारण काय? याची उत्तरं हे सरकार देऊ शकतं का? बेरोजगारी हे या आंदोलनामागचं प्रमुख कारण होतं. कारण या देशातल्या तरुणांच्या हाताला काम नाही.

हे ही वाचा >> खलिस्तानी पन्नूच्या हत्येचा कट; भारतीय नागरिक निखील गुप्ताच्या अटकेवर परराष्ट्र खात्याची पहिली प्रतिक्रिया

राहुल गांधी म्हणाले, विरोधकांनी गृहमंत्री अमित शाह यांना विचारलं की, दोन तरुण संसदेत कसे घुसले? त्यावर उत्तर देण्याऐवजी अमित शाह यांनी १५० खासदारांचं निलंबन केलं. प्रत्येक खासदार लाखो लोकांची मतं घेऊन आलेला आहे. तुम्ही केवळ त्या १५० खासदारांचा अपमान केला नाही. तर देशातल्या ६० टक्के जनतेचं तोंड बंद केलंत. तुम्हाला वाटतंय की तुम्ही देशातल्या जनतेला भिती दाखवाल आणि जनता घाबरेल. पण तसं होणार नाही. तुम्ही अग्निवीरसारखी योजना आणलीत आणि देशातल्या तरुणांची देशभक्तीची भावना हिरावली. जेव्हा हेच तरुण अग्निवीर योजनेविरोधात उभे राहिले तेव्हा तुम्ही त्यांना म्हणालात आंदोलन केलंत तर तुम्हाला सरकारी नोकरी मिळणार नाही.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi slams bjp govt over parliament security breach unemployment asc