दिल्लीत सध्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे केले जात असताना संसदेमध्ये देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. आज काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये बोलताना केंद्र सरकारवर कठोर शब्दांमध्ये हल्लाबोल केला. यावेळी सत्ताधारी इतिहासाचं आकलन करून घेण्यात कमी पडत असल्याचं दिसत असल्याचं ते म्हणाले. तसेच, तुम्ही एका अत्यंत धोकादायक गोष्टीशी खेळत आहात, असं देखील राहुल गाधी म्हणाले.
“माझा तुम्हाला सल्ला आहे, थांबा!”
राहुल गांधींनी आज संसदेत बोलताना केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं. “मला हे समजतंय. तुम्ही कदाचित ते मान्य करणार नाहीत. पण माझ्या पणजोबांनी हा देश उभा करताना १५ वर्ष तुरुंगात काढली. माझ्या आजीवर ३२ गोळ्या झाडल्या गेल्या आणि माझ्या वडिलांच्या चिंधड्या उडवण्यात आल्या. त्यामुळे मी या देशाला थोडंफार ओळखतो. माझ्या पणजोबांनी, माझ्या आजीने आणि माझ्या वडिलांनी या देशासाठी रक्त सांडलं आहे. तुम्ही एका अत्यंत धोकादायक गोष्टीशी खेळत आहात. माझा तुम्हाला सल्ला आहे की थांबा. कारण जर तुम्ही थांबला नाहीत, तर तुम्ही समस्या निर्माण कराल”, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.
“तुम्हाला समस्या दिसणं बंद झालंय”
यावेळी बोलताना राहुल गांधींनी पूर्वेकडील राज्य, तामिळनाडू, जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचे संदर्भ दिले. “तुम्ही आधीच समस्या निर्माण करायला सुरुवात केली आहे. पूर्वेकडे समस्या सुरू झाली आहे. तामिळनाडूमध्येही समस्या निर्माण होत आहेत. त्या तुम्हाला दिसणं आता बंद झालं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये देखील समस्या निर्माण होत आहेत. तुम्ही जे करत आहेत, त्यातून तुमचं इतिहासाचं आकलन कमी असल्याचं दिसून येत आहे”, असं टीकास्त्र राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांवर सोडलं.
“केंद्र सरकारला टीका का सहन होत नाही?”, राहुल गांधींचा लोकसभेत सवाल
तुम्ही प्रत्येकाचा अपमान करत आहात…
“तुम्ही मागे वळून भारतावर राज्य केलेल्या सर्व साम्राज्यांकडे काळजीपूर्वक पाहा. तुम्हाला हे लक्षात येईल की त्यातलं प्रत्येक साम्राज्य संघराज्य होतं. सम्राट अशोक प्रत्येक ठिकाणी अशोकस्तंभ उभे करायचा कारण ते एक असं संघराज्य होतं जिथे सम्राट अशोक प्रत्येकाचा सन्मान करायचा. तुम्ही प्रत्येकाचा अपमान करत आहात. तुम्ही माझा अपमान करा. मला त्याने फरक पडत नाही. पण तुम्ही या देशाच्या लोकांचा अपमान करू शकत नाही”, अशी टीका राहुल गांधींनी यावेळी बोलताना केली.