Rahul Gandhi On Delhi Railway Station stampede: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यासाठी दररोज लाखो भाविक जात आहेत. अशात काल रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ही गर्दी अनियंत्रित झाल्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला असून, १५ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहे. या घटनेनंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया देत रेल्वे प्रशासनाचे अपयश आणि सरकारच्या असंवेदनशीलपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप केला आहे.

“अपयश आणि असंवेदनशीलपणा…”

“नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोकांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आणि वेदनादायी आहे. मी शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या मनापासून सहानुभूति व्यक्त करतो आणि जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करतो. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वेचे अपयश आणि सरकारची असंवेदनशीलता समोर आली आहे. प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता, स्थानकावर चांगली व्यवस्था करायला हवी होती. सरकार आणि प्रशासनाने गैरव्यवस्थापन आणि निष्काळजीपणामुळे कोणालाही आपला जीव गमवावा लागू नये याची काळजी घ्यावी.”

शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत १८ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १२ महिला आहेत.

मृतांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत

रेल्वे बोर्डाचे कार्यकारी संचालक (माहिती आणि प्रसिद्धी) दिलीप कुमार यांनी रविवारी सांगितले की, “नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीची चौकशी करण्यासाठी आणि घटनेमागील कारणे शोधण्यासाठी दोन सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याच वेळी, नवी दिल्ली रेल्वे स्टेशन घटनेतील पीडित आणि मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यामध्ये मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची भरपाई, गंभीर जखमींना २.५ लाख रुपये आणि किरकोळ जखमींना १ लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे.”

पीडितांवर लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात उपचार

दिल्लीच्या काळजीवाहू मुख्यमंत्री आतिशी यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, मध्य दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश रुग्णालयात १८ पैकी १५ जणांना मृतावस्थेत आणण्यात आले होते आणि दोन वगळता सर्व मृतांची ओळख पटली आहे. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये किमान तीन मुले असल्याचे त्यांनी सांगितले. आतिशी म्हणाल्या की, १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.