भारत-चीन सीमावाद अजूनही निवळलेला नाही. चीनकडून कुरापती सुरू असल्याचं वृत्त समोर येत असून, चीनसोबतच्या संबंधावर सातत्यानं भूमिका मांडत असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला सुनावलं आहे. “मी चीनबद्दल वारंवार इशारा देत आहे, पण ते नाकारलं जात आहे,” असं सांगत राहुल गांधी यांनी करोना व अर्थव्यवस्थेविषयी दिलेल्या संकटाची आठवण करून दिली आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मागील काही दिवसांपासून सातत्यानं चीनच्या परराष्ट्र धोरणाविषयी बोलत आहेत. व्हिडीओच्या माध्यमातून ते चीनच्या विस्तारवादाविषयी आपलं म्हणणं मांडत आहे. या मुद्यावरून राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं असून, त्यातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
“मी त्यांना (मोदी सरकार) करोना आणि अर्थव्यवस्थेबद्दल इशारा देत राहिलो. पण, त्यांनी तो नाकारला. त्यानंतर आपत्ती आली. आताही मी त्यांना चीनबद्दल इशारा देत आहे. हा इशाराही ते फेटाळून लावत आहेत,” असं राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.
आणखी वाचा- “दाढी मिशा तर कोणीही वाढवू शकतो, हिंमत असेल तर…”
I kept warning them on Covid19 and the economy. They rubbished it.
Disaster followed.
I keep warning them on China. They’re rubbishing it.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 24, 2020
आणखी वाचा- “पंतप्रधान मोदींकडे दृष्टीकोन नसल्यामुळेच आज…”; राहुल गांधींची बोचरी टीका
राहुल गांधी यांनी २३ जुलै रोजी एक व्हिडीओ ट्विट केला होता. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:ची प्रतिमा बनवण्यावर १०० टक्के लक्ष केंद्रीत केले आहे. भारतातल्या ताब्यात घेतलेल्या संस्था तेच काम करण्यामध्ये व्यस्त आहेत. एका माणसाची प्रतिमा राष्ट्रीय दृष्टीकोनाला पर्याय असू शकत नाही” असे राहुल गांधी यांनी टि्वट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं.