आता दोन भारत आहेत एक अतिशय श्रीमंतांचा भारत आणि दुसरा गरीबांचा या दोन्ही भारतांच्या दरम्यानची दरी दिवसेंदिवस वाढत आहे. रोजगारासाठी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये तरुणांनी जे आंदोलन केलं. त्याबद्दल कोणीच बोलत नाही. गरीब भारताजवळ रोजगार नाही, पण त्याबद्दल कोणीच बोलत नाही. राष्ट्रपतींनी त्यांच्या अभिभाषणात एक शब्दही उच्चारला नाही. देशभरातील तरुण रोजगार शोधताहेत. त्यांना फक्त रोजगार हवा आहे, परंतु मोदी सरकार त्यांना रोजगार देऊ शकत नाही आहे, असं काँग्रेस खासदार राहुल गांधी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत बोलताना म्हणाले. यावेळी सत्ताधारी पक्षाने गोंधळ घातला असता केंद्र सरकारला टीका का सहन होत नाही, असा सवाल त्यांनी केला.
“गेल्या वर्षभरात ३ कोटी तरुणांचा रोजगार गेलाय. तुम्ही मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडियाबद्दल बोललात. तुम्हाला देशातील रोजगाराची परिस्थिती माहिती आहे, तरीही तुम्ही आपल्या भाषणात त्याबद्दल काहीच बोलला नाहीत, असं राहुल गांधी सत्ताधारी पक्षाला म्हणाले. किती रोजगार निर्माण करण्यात आला, किती जणांना रोजगार दिला, याबाबत तुम्ही काहीच माहिती दिली नाही. कारण या बद्दल तुम्ही बोलाल तर तरुण तुमच्याकडे पाहून तुम्ही मजाक करताय असं म्हणेल,” अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भाजपाला सुनावलं.
दोन भारत कसे निर्माण झाले, असा प्रश्न विचारत राहुल गांधी म्हणाले, “रोजगार, लघू आणि मध्यम उद्योग आणि असंघटीत क्षेत्रात याची निर्मिती झाली. या क्षेत्रातून कोट्यवधी रुपये हिसकावून घेत तुम्ही देशातल्या मोजक्या श्रीमंतांना दिले. गेल्या सात वर्षात तुम्ही लघू आणि मध्यम उद्योगांवर आक्रमण केलंय. नोटाबंदी, त्यापाठोपाठ जीएसटी आणि करोनाकाळात त्यांना तुम्ही कोणतीच मदत केली नाही,” असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
लोकांच्या उत्पन्नात घट झाली असून गरीबांची संख्या वाढत आहे. युपीए सरकारने १० वर्षात २७ कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढलं होतं. मोदी सरकारने २३ कोटी लोकांना परत गरिबीमध्ये ढकललं आहे, असा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे सर्वच क्षेत्रात अंबानी आणि अदानी दिसतात. छोटे उद्योग तुम्ही मारून टाकलेत, असं ते म्हणाले.