पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसल्याचं दिसून येत आहे. सत्ताधारी भाजपा व त्यांच्याविरोधात उभ्या राहिलेल्या इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांनी निवडणुकीत विजयाचे दावे केले आहेत. त्यामुळे आता सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने वातावरण तापू लागलं आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने नागपूरमध्ये मोठ्या सभेचं आयोजन करण्यात आलं. ‘हम तैयार है’ असं या सभेचं नामकरण करण्यात आलं. या सभेला खासदार राहुल गांधीही उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात राहुल गांधींनी केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परखड शब्दांत हल्लाबोल केला.
काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधींनी यावेळी देशात विचारसरणींचा लढा चालू असल्याचं म्हटलं. “देशात सध्या विचारधारेची लढाई चालू आहे. खूप सारे पक्ष रालोआ आणि इंडिया आघाडीत आहेत. पण लढाई दोन विचारसरणींमध्ये चालू आहे”, असं म्हणत राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका प्रसंगाबाबत माहिती दिली. काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले एक खासदार आपल्याला भेटल्याचं राहुल गांधी म्हणाले.
“काही दिवस आधी भाजपाचे एक खासदार मला लोकसभेत भेटले. भाजपाचे खूप सारे खासदार आधी काँग्रेसमध्ये होते. हेही काँग्रेसमध्ये होते. ते लपून मला भेटले. मला लांबून पाहिलं. मग लपत, घाबरत मला म्हणाले ‘राहुलजी, तुमच्याशी बोलायचं आहे’. मी म्हटलं काय बोलायचं आहे? तुम्ही तर भाजपामध्ये आहात. मग त्यांच्या चेहऱ्यावर थोडा तणाव दिसला. मी विचारलं ‘सगळं ठीक आहे ना?’ मला म्हणाले ‘नाही. राहुलजी, भाजपामध्ये राहून आता हे सहन होत नाही. मी भाजपामध्ये आहे खरा. पण माझं मन मात्र काँग्रेसमध्ये आहे”, अशी आठवण राहुल गांधींनी यावेळी सांगितली.
“…तेव्हापासून नरेंद्र मोदींचं भाषण बदललं”, राहुल गांधींचा टोला; म्हणाले, “आधी ते स्वत:ला…!”
“वरून आदेश आले की ते मानावे लागतात”
राहुल गांधी पुढे म्हणाले, “मी त्यांना म्हटलं तुमचं मन काँग्रेसमध्ये, शरीर भाजपात आहे. म्हणजे मन शरीराला काँग्रेसमध्ये आणायला घाबरतंय. मन का नाही लागत तिथे? तुम्ही खासदार आहात. तुम्ही मला संकेत देत आहात. तुमचं मन का लागत नाहीये तिथे? तर म्हणाले ‘राहुलजी, भाजपात गुलामी चालते. जे वरून सांगितलं जातं, ते अजिबात विचार न करता करावं लागतं. आमचं कुणी ऐकत नाही. वरून आदेश येतात. जसे आधी राजा ऑर्डर देत असत, तसे आदेश येतात. ते पाळावे लागतात. योग्य वाटो अथवा न वाटो. पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नसतं”, अशा शब्दांत राहुल गांधींनी या प्रसंगाच्या निमित्ताने भाजपावर टीकास्र सोडलं.
“नाना पटोलेंनी प्रश्न विचारला आणि ते आऊट झाले!”
दरम्यान, आपल्या भाषणात राहुल गांधींनी नाना पटोलेंनी मोदींना प्रश्न विचारल्यामुळे ते बाहेर पडल्याचं सांगितलं. “नाना पटोलेंनी पंतप्रधानांना शेतकऱ्यांच्या बाबतीत एक प्रश्न केला होता. जीएसटीमध्ये शेतकऱ्यांचा काय हिस्सा असेल, असा तो प्रश्न होता. मोदींना प्रश्न योग्य वाटला नाही आणि पटोले आऊट झाले. त्यांची विचारसरणी ही राजांची विचारसरणी आहे. वरून येणाऱ्या आदेशांचं पालन तुम्हाला करावं लागतं. काँग्रेस पक्षात खालच्या स्तरातून आवाज येतो. आपला लहानात लहान कार्यकर्ता आपल्या कोणत्याही नेत्याला प्रश्न विचारू शकतो”, असं राहुल गांधी म्हणाले.
“आपले कार्यकर्ते माझ्यासमोर येतात आणि म्हणतात राहुलजी, तुम्ही हे जे केलंय, ते मला आवडलं नाही. मग मी त्यांना समजावतो की अमुक कारणामुळे मी ती गोष्ट केली. मी त्यांचं ऐकून घेतो. त्यांच्या मताचा आदर करतो. हेही सांगतो की मी तुमच्या मताशी सहमत नाही, पण त्यांचं म्हणणं मात्र ऐकून घेतो”, असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.