ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने पद्मश्री पुरस्कार परत केल्यानंतर आता जागतिक कीर्तीची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटनेही पुरस्कार परत केले आहेत. विनेश फोगाट शनिवारी (३० डिसेंबर) खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार पंतप्रधान कार्यालयाला परत करण्यासाठी निघाली होती. परंतु, पंतप्रधान कार्यालयाबाहेरील पोलिसांनी तिला प्रवेशद्वाराबाहेरच रोखलं, त्यामुळे विनेशने नाईलाजाने कर्तव्यपथावर पुरस्कार ठेवले आणि तिथून निघून गेली. कुस्तीपटू बजरंग पुनियाने या घटनेचा व्हिडिओ एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर अपलोड केला आहे. २२ डिसेंबर रोजी बजरंग पुनियानेही अशाच प्रकारे त्याचा पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांच्या निवासास्थानाबाहेर ठेवला होता. त्याआधी बजरंग पुनियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून पद्मश्री पुरस्कार परत करणार असल्याचे सांगितले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुस्तीपटूंचं आंदोलन आणि आता पुरस्कार परत करण्यावरून देशभरातले विरोधी पक्ष केंद्र सरकारला धारेवर धरू लागले आहेत. यामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी महिला कुस्तीपटू विनेश फोगाटच्या समर्थनात भाष्य करत भाजपा आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी एक्सवर एक पोस्ट लिहून विनेशला पाठिंबा दर्शवला आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, देशातल्या प्रत्येक लेकीसाठी तिचा आत्मसन्मान सर्वात महत्त्वाचा आहे. एका घोषित बाहुबलीकडून सरकारला मिळणाऱ्या राजकीय फायद्याची किंमत या शूर मुलींच्या अश्रूंपेक्षा जास्त आहे का? पंतप्रधान हे देशाचे पालक असतात. त्यांची ही क्रूरता पाहून मन दुखावते.

भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक जिंकून बृजभूषण शरण सिंह यांचे सहकारी संजय सिंह नवे अध्यक्ष झाले होते. त्यानंतर ऑलिम्पिक पदकविजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. तर बजरंग पुनिया याने त्याचा पद्मश्री पुरस्कार परत केला. त्यापाठोपाठ गुंगा पहलवान अशी ओळख असलेल्या विरेंद्र सिंह यानेदेखील पद्मश्री परत करण्याची घोषणा केली. त्यानंतर विनेशने खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत केले.

पुरस्कार परत करण्याची घोषणा करताना विनेशने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात तिने लिहिलं होतं की, “देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना हे सगळं करण्यास भाग पडलं आहे. हे आम्हाला का करावं लागतंय ते संपूर्ण देशाला माहिती आहे. तुम्ही देशाचे प्रमुख आहात. ही बाब नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. पंतप्रधान मोदीजी, मी तुमच्या घरची लेक विनेश फोगाट आहे, मी गेल्या वर्षभरापासून ज्या अवस्थेत आहे, तेच सांगण्यासाठी तुम्हाला पत्र लिहित आहे. कुस्ती खेळणाऱ्या आपल्या तरुणींनी गेल्या काही वर्षांमध्ये खूप काही भोगलंय. आमचा जीव गुदमरतोय. साक्षीने आता कुस्तीतून संन्यास घेतला आहे. तर आमचं शोषण करणारा सगळ्यांना सांगत फिरतोय की त्याचा कसा दबदबा आहे. त्याने याबाबत उद्धटपणे घोषणाबाजीदेखील केली.”

हे ही वाचा >> Video: सहा वर्षांच्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल!

“मोदीजी, तुम्ही तुमच्या आयुष्यातली केवळ पाच मिनिटं काढून त्या माणसाने गेल्या काही दिवसांत प्रसारमाध्यमांसमोर केलेली वक्तव्ये ऐका, तुम्हाला कळेल की त्याने काय केलं आहे. तो महिला कुस्तीपटूंना ‘मंथरा’ म्हणाला. महिला कुस्तीपटूंशी चुकीच्या पद्धतीने वागल्याची कबुली त्याने टीव्ही पत्रकारांसमोर दिली आहे. आम्हाला अपमानित करण्याची एकही संधी त्याने कधी सोडली नाही. याहून गंभीर बाब म्हणजे त्याने आतापर्यंत अनेक महिला कुस्तीपटूंना मागे हटण्यास भाग पाडलं. हे खूप क्लेशदायक आहे.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi slams pm narendra modi over vinesh phogat returning khel ratna award asc
Show comments