यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अमेठीतून भाजपाच्या नेत्या तथा माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा परभव झाला. काँग्रेसचे उमदेवार किशोरी लाल शर्मा यांनी दीड लाखांपेक्षा जास्त मतांच्या फरकाने त्यांचा पराभव केला. या पराभवनंतर आता स्मृती इराणी यांना त्यांचा दिल्लीतील बंगला सोडावा लागला आहे. यावरून काँग्रेसचे काही कार्यकर्ते स्मृती इराणी यांना ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. याबाबतच आता राहुल गांधी यांनीही भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राहुल गांधी यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी स्मृती इराणी यांची बाजू घेत काँग्रेस कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे. राजकारणात जय, पराजय होत असतो. पण, एखाद्याचा व्यक्तीचा असा अपमान करणे हे दुर्बलांचे लक्षण आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

हेही वाचा – “विधान परिषदेच्या निवडणुकीत आमची चार मतं फुटणार”, काँग्रेस आमदाराच्या वक्तव्याने खळबळ…

“मी प्रत्येकाला विनंती करतो की त्यांनी स्मृती इराणी किंवा इतर कोणत्याही नेत्यांबाबत अपशब्द बोलू नये. लोकांना तुच्छ लेखणं किंवा त्यांचा अपमान करणं हे शक्तीचे नव्हे तर दुर्बलतेचे लक्षण आहे”, अशी प्रतिक्रियाही राहुल गांधी यांनी दिली. राहुल गांधी यांच्या प्रतिक्रियेची आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता स्मृती इराणी यांना आपला दिल्लीतील सरकारी बंगला रिकामा करावा लागला आहे. दिल्लीतील लुटियन्स भागातील २८, तुघलक क्रिसेंट येथे त्यांचे अधिकृत निवासस्थान होते. गेल्या १० वर्षापासून त्या इथे वास्तव्य होत्या. मात्र, निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने त्या आता लोकसभेच्या सदस्य राहिलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांना त्यांचा सरकारी बंगला रिकामा करावा लागला.

नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमेठीच्या जागेवरून स्मृती इराणी आणि राहुल गांधी यांच्यातील शाब्दीक युद्ध बघायला मिळाले होते. राहुल गांधी यांनी रायबरेलीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्मृती इराणी यांनी त्यांच्यावर टीका केली होती. राहुल गांधी हे घाबरून दुसऱ्या मतदारसंघात गेले, असा टोला त्यांनी लगावला होता. मात्र, या निवडणुकीत राहुल गांधी यांचा विजय झाला, स्मृती इराणी यांना अमेठीतून पराभव स्वीकारावा लागला.

हेही वाचा – संजय राऊत चंद्रकांत पाटलांना विधानभवनात पाहताच म्हणाले, “अरे व्वा, आपण तर एकत्र यायलाच पाहिजे”; पाटलांनीही दिलं मिश्किल उत्तर!

तत्पूर्वी २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीत राहुल गांधी विरुद्ध स्मृती इराणी अशी लढत बघायला मिळाली होती. २०१४ मध्ये राहुल गांधी यांना स्मृती इराणी यांचा पराभव केला, तर २०१९ च्या निवडणुकीत राहुल गांधी यांना स्वत: पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्यांनी केरळच्या वायनाडमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. यावरूनही भाजपाच्या काही नेत्यांनी त्यांना लक्ष्य केलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi social media post for trollers who targeting smriti irani delhi banglow spb