Rahul Gandhi in Srinagar Update: काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगानं जम्मू-काश्मीरमधील निवडणुकांची घोषणा केली. कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच काश्मीरमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून राज्यात प्रचाराला सुरुवात झाली आहे. स्वत: स्वत: राहुल गांधी जम्मू-काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात जाऊन स्थानिकांशी संवाद साधत आहेत. अशाच प्रकारे त्यांनी श्रीनगरमध्ये काही महाविद्यालयीन युवतींशी संवाद साधला. यावेळी त्यांना जम्मू-काश्मीरमधील माध्यम स्वातंत्र्याबाबत युवतींनी विचारणा केली असता त्यावर राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत त्यांची भूमिका मांडली.
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या काश्मीर दौऱ्यावर असून श्रीनगरमध्ये त्यांनी काही महाविद्यालयीन युवतींशी संवाद साधला. यावेळी काश्मीरमधील वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली. रोजगार, शिक्षण, काश्मीरमधील सध्याची परिस्थिती, काश्मिरी महिलांसमोरील समस्या अशा विविध मुद्द्यांवर राहुल गांधींनी युवतींच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी काश्मीरमधील माध्यम स्वातंत्र्याबाबत त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी सविस्तर भाष्य केलं.
काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधींनी यावेळी काश्मीरमध्ये माध्यम स्वातंत्र्याची मोठी समस्या असल्याचं नमूद करतानाच देशभर हेच चित्र असल्याचं म्हटलं. “मला काश्मीरमधील माध्यम स्वातंत्र्याची मोठी अडचण दिसते आहे. देशभरात हेच चित्र आहे. पंतप्रधानांबाबत माझं मत आहे किंवा माझी त्यांच्याबाबत अडचण ही आहे की ते कुणाचंच ऐकत नाहीत. दुसरं म्हणजे सुरुवातीपासूनच ज्यांना असा विश्वास असतो की ते बरोबरच आहेत, अशा व्यक्तींबाबत मला अडचण असते. त्यांना जरी सारंकाही दिसत असलं, कुणी त्यांना सांगत असलं की ते जे बोलत आहेत ते चुकीचं आहे तरी ते ही बाब मान्य करणार नाहीत. अशा व्यक्ती नेहमी कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या अडचणी निर्माण करत असतात”, अशा शब्दांत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत भाष्य केलं.
“मला वाटतं ते हे जे काही वागत आहेत, ते सर्व असुरक्षिततेच्या भावनेतून येतं. अशी वृत्ती तुमच्या सामर्थ्यातून येत नाही, तुमच्या कमकुवतपणातून येत असते”, असंही राहुल गांधी म्हणाले.
राजकारणात येण्याचा विचार कधी केला?
दरम्यान, लहानपणापासूनच राजकारणात यायचं होतं का? अशी विचारणा करताच राहुल गांधींनी तसं काही ठरवलं नव्हतं असं म्हणाले. “मी लहानपणी राजकारणात यायचं ठरवलेलं नव्हतं. पण जेव्हा बाबांचं निधन झालं, तेव्हा मला वाटलं की मी राजकारणात यायला हवं. माझ्या वडिलांच्या निधनानंतर मला वाटलं की त्यांना जे करायचं होतं, ते करण्यापासून कुणीतरी त्यांना थांबवलं. मग मी राजकारणात येण्याचा विचार केला. तुम्हाला समोर दिसणाऱ्या कोणत्याही गोष्टी बदलण्यासाठी आधी स्वत:ला बदलावं लागतं”, असं राहुल गांधी म्हणाले.
“राज्यशास्त्र व वास्तव राजकारणाचा काहीही संबंध नाही”
दरम्यान, आपल्या शिक्षणाचा संदर्भ देतानाच राहुल गांधींनी राज्यशास्र व वास्तव राजकारण यांचा काहीही संबंध नसल्याचं नमूद केलं. माझा राज्यशास्त्राचा अभ्यास करण्याबाबतचा अनुभव असा आहे की जे ते तुम्हाला विद्यापीठांमध्ये शिकवतात, त्याचा वास्तव राजकारणाशी काहीही संबंध नसतो. ते कुठल्यातरी वेगळ्या जगातलं शिक्षण असतं आणि वास्तव राजकारण वेगळ्याच विश्वात घडत असतं”, असं राहुल गांधी म्हणाले.