उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे १५ जानेवारीपासून कुंभमेळा सुरु होणार असून या कुंभमेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारमधील आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांना निमंत्रण दिले आहे. राहुल गांधी यांनी या कुंभमेळ्यात येऊन गंगास्नान करावे, जेणेकरुन राफेल प्रकरणात ते जे खोटं बोलत आहे त्याचे पाप धुतले जातील, असे सिंह यांनी म्हटले आहे.

सिद्धार्थनाथ सिंह यांनी शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना कुंभमेळाव्याचे निमंत्रण दिले. ते म्हणाले, राहुल गांधी यांनी या कुंभमेळाव्यात यावे. या महामेळाव्यात पवित्र गंगानदीत स्नान केल्याने त्यांचे पाप धुतले जातील. गंगामाता त्यांना माफ करेल. राफेल प्रकरणात ते खोटे दावे करुन जनतेची दिशाभूल करत आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रयागराज येथे १५ जानेवारीपासून कुंभमेळा भरवला जाणार असून या महामेळाव्यात १२ कोटी भाविक हजेरी लावण्याची शक्यता आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. कुंभमेळाव्यातील चार मेळाव्यांपैकी प्रयागराज (अलाहाबाद) येथील कुंभमेळा महत्त्वाचा मानला जातो. या मेळाव्यानिमित्त २०० हून अधिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. याशिवाय पर्यटकांसाठी विविध प्रदर्शने, कला दालन आदींचा समावेश आहे. देखाव्यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यात येणार आहे.

दरम्यान, शुक्रवारी संसदेत राफेलवर वादळी चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राफेल घोटाळ्यात अप्रत्यक्ष सहभाग आहे असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी लोकसभेत केला. अनिल अंबानी यांचे नाव या करारात कसे आले? फ्रान्सचे अध्यक्ष म्हणत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नाव पुढे आणले, असा दावा त्यांनी केला. सत्तेवर आल्यास राफेल घोटाळ्याची चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Story img Loader