मोदी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार काल पार पडला. यामध्ये अनेक मंत्र्याना डच्चू देण्यात आला. डॉ. हर्ष वर्धन यांना केंद्रीय आरोग्यमंत्रीपदावरून काढून टाकण्यात आले. दरम्यान,मनसुख मंडाविया यांच्याकडे केंद्रीय आरोग्यमंत्री पदाची जबाबदारी सोपविली गेली आहे. देशात करोना काळात डॉ. हर्ष वर्धन यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. लसीच्या तुटवड्यामुळे त्यांना लोकांच्या रोषाचा देखील सामना करावा लागला. दरम्यान, आरोग्यमंत्री बदलल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सवाल केला आहे.
राहुल गांधी ट्विट करत सवाल विचारला आहे. “याचा अर्थ यापुढे लसीची कमतरता भासणार नाही?.” यासोबत राहुल गांधींनी ‘चेंज’ असा हॅशटॅग दिला आहे.
Does this mean no more vaccine shortage?#Change
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 8, 2021
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे ‘बेजबाबदार’ आहेत आणि कोणत्याही कारणाशिवाय टीका करतात, असे म्हणत भाजपाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी राहुल गांधींवर पलटवार केला.
देशात गेल्या २४ तासात ४५,८९२ नव्या बाधितांची नोंद
देशातील अनेक भागात निर्बंधातून सूट दिल्यानंतर आता करोना रुग्णसंख्येत पुन्हा मोठ्या संख्येने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे करोनाचा कहर अद्याप सुरुच आहे. गेल्या २४ तासांत देशभरात तब्बल ८१७ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी ही आकडेवारी ५०० पेक्षा ही कमी होती. मात्र अचानक मृत्यूंमध्ये वाढ झाल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या २४ तासांत ४५,८९२ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये ४५,८९२ नवीन करोना बाधित आढळून आले आहेत आणि ८१७ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. बुधवारी दिवसभरात ४४,२९१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.