कुठली एक व्यक्ती देशातील कोटय़वधी लोकांच्या समस्या सोडवू शकत नाही. घोडय़ावर स्वार होऊन कुणी सर्व समस्या सोडवील, अशी अपेक्षा बाळगणे अनाठायी ठरेल, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी गुजरातचे मुख्यमंत्री व पंतप्रधानपदाचे भावी उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध दंड थोपटले. भारतीय औद्योगिक महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी स्वत:च्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीची चर्चाही फेटाळून लावली.
काँग्रेसचे उपाध्यक्ष झाल्यानंतर राहुल यांनी पहिल्यांदाच देशातील प्रमुख उद्योजकांची भेट घेतली. आज देशात लोकांच्या आवाजावर चर्चा होत नाही. वृत्तपत्रांमध्ये केवळ एकाच व्यक्तीविषयी चर्चा सुरू असल्याचे पाहून मी निराश होतो. मनमोहन सिंग किंवा अन्य कुणी सर्व प्रश्नांचे निराकरण करील, असे होणार नाही. एक अब्ज लोकांना ताकद दिली तर सारे काही लगेच ठीक होईल, असा सर्वसमावेशकतेचा युक्तिवाद राहुल गांधी यांनी केला. एकटय़ा राहुल गांधींचे कोणतेही महत्त्व नाही. चार हजारांहून अधिक आमदार आणि सातशेहून अधिक खासदार देश चालवितात, असे ते म्हणाले. समाजात फूट पाडण्याच्या राजकारणामुळे लोकांची आणि विचारांची देवाणघेवाण रोखली जाते. जेव्हा असे घडते तेव्हा त्याचा सर्वानाच फटका बसतो. व्यापार प्रभावित होतो आणि दुराव्याची बीजे पेरली जातात, असे ते म्हणाले.

Story img Loader