गेल्या सहा दिवसांपासून दिल्लीत विरोधी पक्षांच्या खासदार निलंबन प्रकरणाची चर्चा पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत विरोधी पक्षाच्या जवळपास १५० खासदारांचं निलंबन केलं असून या कारवाईवर विरोधी पक्षांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. यासंदर्भात राष्ट्रीय पातळीवर आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. त्यातच आता तृणमूलच्या खासदारांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केल्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी या सगळ्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करत होते. त्यावरून सत्ताधारी टीका करत असताना आता राहुल गांधींनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय घडलं?
मंगळवारी संसद भवनाच्या आवारात निलंबित खासदारांकडून आंदोलन केलं जात असताना तिथे काँग्रेस खासदार राहुल गांधीही उपस्थित होते. यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे पदसिद्ध सभापती व देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केली. हा व्हिडीओ राहुल गांधी रेकॉर्ड करत असल्याचंही दिसून आलं. यावरून आता सत्ताधारी व विरोधी पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोप चालू असताना राहुल गांधींनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधींना प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी यासंदर्भात विचारणा केली असता राहुल गांधींनी सगळे दावे माध्यमांमध्येच चालू असल्याची प्रतिक्रिया दिली. “अपमान कुणी केला? कसा केला? तिथे खासदार बसले होते. मी त्यांचा व्हिडीओ घेतला. माझा व्हिडीओ माझ्या मोबाईलवर आहे. माध्यमं व्हिडीओ दाखवून दावे करत आहेत. म्हणे मोदी बोलतायत. पण कुणी काही बोललेलंच नाहीये”, असं राहुल गांधी म्हणाले. गेल्या आठवड्याभरापासून विरोधी पक्षाचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत लोकसभा घुसखोरी प्रकरणी निवेदन करण्याची मागणी करत आहेत.
“आमच्या १५० खासदारांना बाहेर फेकून दिलं आहे. त्याबद्दल माध्यमांमध्ये कोणतीही चर्चा होत नाहीये. त्यांना संसदेतून बाहेर फेकून दिलं. त्यावर अजिबात चर्चा होत नाही. अदाणींवर चर्चा होत नाही. राफेल करारावर फ्रान्सनं सांगितलं की तपास होऊ देत नाही. पण त्यावर चर्चा होत नाही. बेरोजगारीवर चर्चा होत नाही. आमचे खासदार तिथे दु:खी होऊन बसले आहेत. त्यांच्यावर माध्यमे चर्चा करत आहेत”, असंही राहुल गांधी म्हणाले.