गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या हिंदू आणि हिंदुत्व या शब्दांवरून बरीच चर्चा सुरू झाली आहे. हिंदू आणि हिंदुत्व वेगवेगळे आहेत की एकच आहेत, यावर वाद सुरू आहे. यासंदर्भात आज राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या अमेठीमध्ये घेतलेल्या सभेत स्पष्टीकरण दिलं. तसेच, या मुद्द्यावरून भाजपावर परखड टीका करतानाच महात्मा गांधींना हिंदू असल्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हटलं आहे. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या भगिनी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी देखील होत्या.

“..सर्वोत्तम उदाहरण म्हणजे महात्मा गांधी!”

“मी तुम्हाला हिंदू म्हणजे काय ते सांगतो. हिंदू म्हणजे अशी व्यक्ती, जी फक्त सत्याच्या मार्गावर मार्गक्रमण करते, जी व्यक्ती कधीच घाबरत नाही, निडर असते आणि जी व्यक्ती कधीच तिच्या भितीचं रुपांतर हिंसा किंवा द्वेष किंवा रागात करत नाही. त्याचं सर्वोत्तम उदाहरण महात्मा गांधी आहेत”, असं राहुल गांधी यावेळी बोलताना म्हणाले.

महात्मा गांधी हिंदू, तर गोडसे…

दरम्यान, यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यातला त्यांना अपेक्षित असलेला फरक देखील स्पष्ट केला. “महात्मा गांधींनी त्यांचं पूर्ण आयुष्य सत्य समजून घेण्यात घालवलं, तर दुसरीकडे गोडसे हा हिंदुत्ववादी होता. गोडसेला कुणीही महात्मा म्हणत नाही, कारण त्याने एका अशा हिंदूची हत्या केली, जे नेहमी सत्य बोलायचे. गोडसे हा घाबरट होता. एक कमकुवत माणूस होता. तो त्याच्या भितीचा सामना करू शकला नाही”, असं राहुल गांधी म्हणाले.

मोदींनी सत्याला कधी संरक्षण दिलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल गांधींनी त्यांच्यासमोर सवाल उपस्थित केला आहे. “एक हिंदुत्ववादी गंगेत एकटाच आंघोळ करतो, तर हिंदू कोट्यवधी लोकांसोबत गंगेत आंघोळ करतो. नरेंद्र मोदी स्वत:ला हिंदू म्हणवतात, पण त्यांनी सत्याचं संरक्षण कधी केलं आहे? त्यांनी लोकांना कोविडपासून संरक्षण मिळण्यासाठी थाळ्या पिटायला सांगितलं. ते हिंदू की हिंदुत्ववादी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

“यूपी प्लस योगी, बहुत है उपयोगी”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशात दिला नारा!

मी पहिल्यांदाच असं पाहिलं की एक व्यक्ती…

दरम्यान, राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या गंगा स्नानावर निशाणा साधला. “मी पहिल्यांदाच असं पाहिलं, की फक्त एक व्यक्ती गंगेमध्ये स्नान करत आहे. योगीजींना बाजूला केलं. राजनाथ सिंह यांनाही बाजूला केलं. मोदीजी तरुण होते तेव्हा मगरीशी भिडले होते हे आठवतंय का? पण मला वाटलं त्यांना पोहताच येत नसेल”, असं म्हणत राहुल गांधींनी खोचक टोला लगावला.

Story img Loader