देशात एकीकडे पंजाबच्या राजकीय वर्तुळात काँग्रेसमधल्या उलथा-पालथींमुळे कलह निर्माण झालेला असताना दुसरीकडे काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी भाजपावर आणि विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील आपली आघाडी सुरूच ठेवली आहे. राहुल गांधी सध्या केरळच्या दौऱ्यावर असून केरळमधील मलप्पुरममध्ये बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. देशाच्या एकतेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी घाव घालत असल्याची टीका राहुल गांधींनी केली आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.
“ते म्हणतात भारत प्रदेश आहे, आम्ही म्हणतो…”
मलप्पुरममध्ये बोलताना राहुल गांधी म्हणाले, “ते (मोदी) म्हणतात भारत हा एक प्रदेश आहे. आम्ही म्हणतो भारत म्हणजे लोक आहेत, नातेसंबंध आहेत. ही हिंदूंची मुस्लिमांसोबतची नाती आहेत. मुस्लिम आणि शिखांमधली, तामिळ-हिंदी-उर्दू-बंगालीमधली नाती आहेत. माझा पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आक्षेप हा आहे की ते ही नाती तोडत आहेत.”
हम सब भारत हैं।
और भारत नफ़रत से जीत कर रहेगा।#NoHate pic.twitter.com/cjDivnblWv
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 29, 2021
‘भारत’ या संकल्पनेवरच आघात
“जर भारतीयांमधली नाती पंतप्रधान नरेंद्र मोदी तोडत असतील, तर ते ‘भारत’ या संकल्पनेवरच आघात करत आहेत. म्हणून मी त्यांना विरोध करतोय. आणि त्याचप्रकारे, जर ते भारतीयांमधील नाती तोडत असतील, तर भारतीयांमधला दुवा पुन्हा एकदा उभा करणं हे माझं कर्तव्य आणि बांधिलकी आहे”, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. “प्रत्येक वेळी दोन भारतीयांमधील नातं तोडण्यासाठी ते द्वेषाचा आधार घेतात. प्रेमाचा आधार घेऊन ती नाती पुन्हा जोडणं हे माझं काम आहे. आणि हे फक्त माझं काम नसून आपल्या सगळ्यांचं काम आहे. या देशातल्या वेगवेगळ्या संस्कृती, परंपरा, कल्पना, धर्म समजून घेतल्याशिवाय हे काम मी करू शकणार नाही”, असं देखील राहुल गांधींनी यावेळी नमूद केलं.