सरकारच्या परराष्ट्रनीतीवर राहुल गांधींची परखड टीका
नवी दिल्ली : चीन आणि पाकिस्तानला आपल्या विरोधात एकत्र येऊ देण्याची घोडचूक केंद्राच्या परराष्ट्र धोरणाने केली आहे. तुम्ही (भाजप) देशाच्या सुरक्षेशी खेळत आहात, नागरिकांना धोक्याच्या खाईत लोटत आहात. न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, ‘पेगॅसस’चा गैरवापर करून लोकांचा विरोधी आवाज दाबून टाकत आहात. देश बाहेरून आणि आतूनही पोखरला जात आहे. आमचे ऐका, ‘शहेनशाही’ प्रवत्ती दाखवून लोकशाही-संघराज्य नष्ट करू नका, असा सज्जड इशारा काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभेतील भाषणात दिला.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना राहुल गांधी यांनी बेरोजगारी, महागाई, श्रीमंत-गरीब दरीतून निर्माण झालेले दोन ‘भारत’ राज्यांच्या अधिकारावरील गदा आणून ‘सम्राट’ बनण्याची प्रवृत्ती अशा वेगवेगळय़ा वादग्रस्त मुद्दय़ांना हात घातला. केंद्र सरकारच्या परराष्ट्रनितीचे राहुल गांधी वाभाडे काढले. ‘भारताची कोंडी करणारे सुस्पष्ट धोरण चीनने आखले आहे. डोकलाम आणि लडाखमध्ये चीनने हे धोरण (घुसखोरी) अमलात आणले आहे. चीनपासून भारताला प्रचंड मोठा धोका निर्माण झालेला आहे. आपण जम्मू-काश्मीरमध्ये आणि एकूणच परराष्ट्र धोरणात घोडचुका केल्या आहेत. आत्तापर्यंत भारताने चीन आणि पाकिस्तानला एकत्र येऊ न देण्याची दक्षता परराष्ट्रनीतीतून घेतली होती पण, आता आपल्या चुकीच्या धोरणांमुळे चीन-पाक एकत्र आले आहेत. आपल्या दोन्ही सीमांवरील शत्रूंनी संयुक्त सीमा तयार केली आहे. या शत्रूंना दुबळे मानण्याची चूक करू नका़ आपण चीनशी मुकाबला करू शकतो पण, भविष्यात जे होईल त्याला तुम्हीच जबाबदार असाल,’ अशी परखड टीका राहुल यांनी केली. भारताच्या सीमांवर श्रीलंका, नेपाळ, म्यानमार, पाकिस्तान, चीन अशा सगळय़ा बाजूंनी आपण घेरले गेलो आहोत. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत एकाकी पडला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ाला पाहुणे का मिळत नाहीत, अशी विचारणा राहुल यांनी केली.
‘मेड इन इंडिया’ होऊच शकत नाही!
केंद्रातील विद्यमान सरकारने श्रीमंत व गरीब असे दोन ‘भारत’ निर्माण केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. छोटे उद्योग बंद झाले, असंघटित क्षेत्र संपवून टाकले. गेल्या वर्षी ३ कोटी रोजगार नष्ट झाले. ८४ टक्के लोकांचे उत्पन्न घटले. यूपीए सरकारने २७ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आणि तुम्ही २३ कोटींना पुन्हा गरिबीत ढकलले, अशी टीका त्यांनी केली़
न्यायालय, निवडणूक आयोग, पेगॅससचा गैरवापर
देशातील न्यायालय, निवडणूक आयोग अशा संस्थाच्या माध्यमातून आणि ‘’पेगॅसस’’सारख्या तंत्रज्ञानाच्या आधारे राज्यांना कमकुवत केले जात आहे. ‘’भारत’’ नावाची संघराज्यीय संकल्पना संपवली जात आहे. मोदींनी इस्रायलला जाऊन ‘’पेगॅसस’’ आणले मग, आसामपासून तामीळनाडूपर्यंत सगळय़ांवर हल्लाबोल केला. ईशान्येतील राज्ये, तामीळनाडू, जम्मू-काश्मीर अशा अनेक राज्यांत असंतोष निर्माण होत आहे. ३ हजार वर्षांत जे जमले नाही, ते आता करण्याचा प्रयत्न करू नका. संघराज्याच्या संकल्पनेवर हल्ला करू नका. तुम्ही (मोदी) आगीशी खेळत आहात. तुम्हाला इतिहासाचे आकलन नाही. लोकांचा अनादर करून ‘’सम्राट’’ टिकू शकत नाही. राज्या-राज्यात दुजाभव करू नका, लोकांचे एकमेकांमधील नाते तोडू नका. त्यांना रोजगार द्या. त्यांना सक्षम बनवा, असे राहुल म्हणाले.
शहांनी माफी मागावी!
मणिपूरच्या नेत्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिलेल्या कथित गैरवागणुकीचा संदर्भ देत राहुल यांनी शहांच्या माफीची मागणी केली. शहांच्या घरात प्रवेश करताना मणिपूरमधील नेत्याला बुट काढण्याचा आदेश दिला गेला. ते अनवाणी आत गेले पण, शहा मात्र चप्पल घालून वावरत होते. हा दुजाभाव योग्य नाही. शहांनी संबंधित नेत्याची माफी मागितली पाहिजे, असे राहुल म्हणाले. भाजपचे कमलेश पासवान यांनी अनुमोदनाचे भाषण केले. पासवान हे अनुसूचित जातीतून आले आहेत. त्यांचा मला अभिमान वाटतो. दलितांवर झालेल्या ३ हजार वर्षांचा इतिहास त्यांना माहीत आहे. त्यामुळे ते चुकीच्या पक्षात आहेत, असे राहुल म्हणाले. त्यावर, काँग्रेसचे दलितांबद्दल धोरण काय आहे, हेही मला माहीत आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी सल्ला देऊ नये, असे प्रत्युत्तर पासवान यांनी दिले.