काँग्रेसचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सकारात्मक राजकारणावर भर देण्याचे ठरविले आहे. सकारात्मक राजकारणानेच देशाची प्रगती होऊ शकते, असे मत बुधवारी त्यांनी काँग्रेस मुख्यालयात उपाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पत्रकारांना सामोरे जाताना व्यक्त केले. त्यांनी बुधवारी २४, अकबर रोड येथील काँग्रेस मुख्यालयात उपाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. हे निमित्त साधून अखिल भारतीय काँग्रेसचे सर्व सरचिटणीस आणि विभाग प्रमुखांसोबत त्यांनी चर्चा केली.
‘राजकीय चर्चेत नेहमीच आपसातील संघर्ष आणि नकारात्मकता दिसते. ती कमी व्हायला हवी. आपला देश एक अद्भुत देश असून, त्यात अनेक आश्चर्यकारक गोष्टी करण्याची क्षमता आहे. अनेक तरुण हे परिवर्तन घडवून आणत आहेत. देशात बदल घडवून आणण्यासाठी काँग्रेस पक्षाचा माध्यम म्हणून वापर व्हावा,’ असे त्यांनी सांगितले.

Story img Loader