नवी दिल्ली : हरियाणातील पराभवानंतर काँग्रेसमध्ये वाद सुरू असून काँग्रेसच्या विजयापेक्षा नेते स्वत:चे हितसंबंध जपण्यात गर्क होते, असा संताप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीमध्ये व्यक्त केल्याचे समजते. या नामुष्कीजनक पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी सत्यशोधन समिती नेमली जाणार असल्याचे सांगितले जाते.
हरियाणाच्या प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांवर राहुल गांधी कमालीचे नाराज झाले असून कुमारी शैलजा, रणदीप सुरजेवाला, तसेच कॅप्टन अजय यादव या प्रमुख नेत्यांना बैठकीलाही बोलावण्यात आले नाही. प्रदेशाध्यक्ष उदय भान यांना निमंत्रण दिले गेले मात्र ते उपस्थित राहिले नाहीत.
हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीची सर्व सूत्रे भूपेंद्र हुड्डा यांच्याकडे देण्यात आली होती. पक्षांतर्गत मतभेद तसेच उमेदवारांच्या निवडीबाबत प्रदेश नेत्यांनी संघटना सचिव के. सी. वेणुगोपाल यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, हुड्डा व वेणुगोपाल यांनी नेत्यांच्या नाराजीकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. हे दोन्ही नेते गांधी कुटुंबाचे निष्ठावान मानले जातात. त्यामुळे सत्यशोधन समितीच्या अहवालानंतरही त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता नसल्याचे मानले जात आहे. यापूर्वीही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर समित्या नेमल्या गेल्या, पण त्यांचे अहवाल बासनात गुंडाळून ठेवले गेले होते.
हेही वाचा :काश्मीरमध्ये ओमर मुख्यमंत्री; हरियाणात दसऱ्यानंतर निर्णय
या बैठकीला भपेंद्र हुड्डा, के. सी. वेणुगोपाल, हरियाणाच्या निवडणुकीसाठी नियुक्त केलेले निरीक्षक अशोक गेहलोत व अजय माकन, प्रताप बाजवा तसेच, जयराम रमेश, पवन खेरा, नासीर हुसैन आदी नेतेही उपस्थित होते. प्रभारी दीपक बाबरिया दूरचित्रसंवादाद्वारे सहभागी झाले होते. हुड्डा व वेणुगोपाल यांच्या समक्ष राहुल गांधींनी हरियाणाच्या पराभवाबद्दल प्रदेश नेत्यांना जबाबदार धरल्याचे समजते. हरियाणातील पराभव काँग्रेससाठी धक्कादायक असल्याने आता पक्षांतर्गत वाद विकोपाला गेल्याचे स्पष्ट आहे.
हुड्डांच्या पाठीराख्यांनी पराभवाचे खापर मतदानयंत्रांमधील कथित अफरातफरीवर फोडले आहे. २० मतदारसंघांमध्ये मतमोजणीमध्ये गोंधळ झाला असून ७ मतदारासंघांबाबत काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अधिकृतपणे तक्रार दाखल केली आहे. ज्या मतदानयंत्रांमध्ये अधिक मते पडली होती, मतमोजणीनंतरही या यंत्रांची बॅटरी ९० टक्के चार्ज होती तर, कमी मते पडलेल्या मतदानयंत्रांची बॅटरी ४०-५० टक्के चार्ज होती. मतमोजणी करताना मतदानयंत्रांमध्ये फेरफार झाला असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. यासंदर्भात काँग्रेस नेत्यांनी बुधवारी निवडणूक आयोगाची भेट घेतली होती. या आरोपाचेही सत्यशोधन समितीद्वारे केले जाणार असल्याचे समजते.