मोदी सरकार हे ‘सूटबूटां’चे सरकार असल्याच्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीकेला रविवारी संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी प्रत्युत्तर दिले. नायडू यांनी राहुल गांधींच्या टीकेची तुलना पोरकट आणि अपरिपक्व, अशी केली. तसेच सूटाबूटांचे सरकार असल्याची टीका करणारे राहुल गांधी त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी देखील सूटबूटात वावरायचे हे ते विसरले का? किंवा असे वक्तव्य करून राहुल त्यांच्या वडिलांवर देखील टीका करीत आहेत का? त्यांचाही उपहास करीत आहेत का? अशा प्रश्नांची सरबत्तीच नायडू यांनी जोडली. राहुल गांधी यांनी कोणतेही वक्तव्य करण्याआधी दोनवेळा विचार करावा. एका राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याच्या वक्तव्यात परिपक्वता असायला हवी. पंतप्रधानांच्या कपड्यांना अनुसरून अशा प्रकारची निरर्थक टीका करणे राष्ट्रीय पक्षाच्या नेत्याला शोभणारे नाही, या आवेशात नायडू यांनी राहुल यांच्यावर कुरघोडी केली.
दरम्यान, बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी जाहीर सभांमध्ये मोदी सरकारचा ‘सूट बूट की सरकार’ असल्याचा उल्लेख करून हल्लाबोल करून पक्षाच्या प्रचाराचा धुरळा उडवून दिला आहे. केंद्राप्रमाणे राज्यात पण ‘रालोआ’चे सरकार आले तर शेतकऱयांचे हक्क आणि जमिनी ‘सूट बूट’वाले  बळकावतील, असे राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा